अधिवेशनात सरकारला जाब विचारणार
By Admin | Published: March 2, 2015 01:40 PM2015-03-02T13:40:34+5:302015-03-02T13:40:34+5:30
शेतकर्यांना मदत करण्याऐवजी त्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार सरकार करीत असून, आगामी अधिवेशनात याप्रश्नी शासनाला जाब विचारणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.
परभणी : दुष्काळग्रस्त शेतकर्यांसाठी शासनाने ७ हजार कोटीचे पॅकेज जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात केवळ २ हजार कोटींचीच मदत वाटप होत आहे. शेतकर्यांना मदत करण्याऐवजी त्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार सरकार करीत असून, आगामी अधिवेशनात याप्रश्नी शासनाला जाब विचारणार असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.
२८ फेब्रुवारी रोजी परभणी तालुक्यातील दुर्डी या गावास भेट देऊन धनंजय मुंडे यांनी दुष्काळाची पाहणी केली. ते म्हणाले, ४५ रुपये गुंठा या प्रमाणे राज्य शासन मदत देत आहे. दिलेली मदतही जाणीवपूर्वक उशिरात उशिरा दिली जात आहेत. प्रशासनाकडूनही बागायतीचे क्षेत्र कसे कमी दाखविता येईल, याचा प्रयत्न केला जात आहे. त्यातच अवकाळी पावसाने शेतात जी काही पिके उभी होती त्याचेही नुकसान झाले. त्यामुळे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचीही भरपाई शासनाने शेतकर्यांना द्यावी, यासाठी आपण आग्रही राहणार असून, आगामी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. दुर्डी येथील संजय चोपडे यांच्या शेतासही त्यांनी भेट दिली. यावेळी राकाँ जिल्हाध्यक्ष तथा आ.विजय भांबळे, शहर जिल्हाध्यक्ष अँड.स्वराजसिंह परिहार, तालुकाध्यक्ष सुरेश भुमरे, माजी खा.सुरेश जाधव आदींची उपस्थिती होती.
रविवारी मुंडे यांनी जिंतूर तालुक्यातील पांगरी या गावासही भेट दिली. भर पावसात त्यांनी या गावातील दुष्काळाची पाहणी केली. यावेळी आ. विजय भांबळे, माजी खा.सुरेश जाधव, जि .प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, जि. प. सदस्य विश्वनाथ राठोड, रामेश्वर जावळे, नानासाहेब राऊत, गजानन कांगणे, सुधाकर जाधव, शरद अंभुरे, प्रसाद बुधवंत, केशव बुधवंत आदींची उपस्थिती होती.
यावेळी त्यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. हे सरकार शेतकरी विरोधी असून, संकटग्रस्त शेतकर्यांना मदत करण्याऐवजी देशोधडीला लावण्याचे काम सरकार करीत असल्याची टीका त्यांनी केली. /(प्रतिनिधी)
आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदत
> विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी वरुड नृसिंह येथील आत्महत्याग्रस्त महादेव डोंबे यांच्या कुटुंबियांना भेट देऊन ५0 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. यावेळी त्यांनी डोंबे कुटुंबियांच्या दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये देण्याचे जाहीर केले. राकाँचे प्रदेश सचिव डॉ.संजय रोडगे यांनी एका मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे मान्य केले. यावेळी आ.विजय भांबळे, नानासाहेब राऊत, माजी खा. सुरेश जाधव, रामेश्वर जावळे, शरद अंभुरे, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, मनोज थिटे, सिरकू पाटील, विजय खिस्ते, बाळासाहेब भांबळे, गजानन कांगणे आदींची उपस्थिती होती.