मानवतमध्ये चोऱ्यांचे सत्र थांबेना; मजुरांना कोंडून शाळेतील १ लाखाचे साहित्य लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 03:44 PM2021-07-31T15:44:56+5:302021-07-31T15:45:40+5:30
शाळेच्या इमारतीची पाहणी केली असता 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्या
मानवत: शहरातील आदित्य पार्क परिसरात असलेल्या रॉयल क्लिफ इंग्लिश शाळेच्या इमारतीतील 1 लाख 12 हजार रुपयांचे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शनिवारी ( दि. ३१ ) पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरात चोऱ्यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिक धास्तावले आहेत.
शहरातील आदित्य परिसरात रॉयल क्लिफ इंग्लिश स्कूल यावर्षी सुरू झाली आहे. या शाळेच्या परिसरात रामेश्वर संतराम घाटूळ व नामदेव सौदागर हे दोन मजूर पत्र्याच्या शेडमध्ये राहतात. शनिवारी पहाटे 4:30 वाजता मजुरांनी शाळेचे व्यवस्थापक राहुल बाहेकर यांना फोन करून शेडच्या दरवाज्याची कडी अज्ञाताने बाहेरून लावल्याची माहिती दिली.
व्यवस्थापक बाहेकर यांनी तातडीने शाळेकडे धाव घेत मजुरांच्या शेडची कडी उघडली त्यानंतर शाळेच्या इमारतीची पाहणी केली असता 1 लाख 12 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. व्यवस्थापक राहुल भायेकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस करत आहेत.
चोऱ्यांचे सत्र थांबेना
मागील दहा ते पंधरा दिवसापासून शहरात विविध ठिकाणी चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. हे चोऱ्यांचे सत्र थांबत नसल्याने शहरातील नागरिक धास्तावले आहेत. नाईट पेट्रोलिंगसाठी बीट मार्शलची स्थापना करून सुस्त असलेल्या पोलिस प्रशासनाने चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.