जिल्ह्यात सात दिवसांत कोरोनाने दगावले ६० रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:17 AM2021-04-09T04:17:57+5:302021-04-09T04:17:57+5:30
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना धास्ती निर्माण झाली आहे. या संसर्गाला आवर घालण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले ...
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांना धास्ती निर्माण झाली आहे. या संसर्गाला आवर घालण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यास यश आले नाही. रुग्णांची वाढलेली संख्या ज्या प्रमाणे चिंतेची बनत आहे, त्यापेक्षा अधिक चिंताजनक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूची आहे.
मागील आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणे २ ते ३ रुग्णांवर होते. मात्र १ एप्रिलपासून रुग्ण दगावण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांची चिंता आणखीच वाढली आहे.
१ ते ७ एप्रिल या सात दिवसांत जिल्ह्यातील ६० जणांना प्राण गमवावा लागला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्यावर शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. जिल्ह्यात वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजन बेडसाठी धावपळ होत आहे. त्यातच मागील आठवड्यामध्ये रेमडेसिवीर या इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
१ एप्रिल रोजी जिल्ह्यातील ११ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यानंतर ७ एप्रिल रोजी सर्वाधिक १२ रुग्ण कोरोनाने मृत्यू पावले आहेत. याच काळात दि. २ आणि ३ एप्रिल रजी प्रत्येकी ६, ४ आणि ५ एप्रिल रोजी ८ आणि ६ एप्रिल रोजी ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्ह्यात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्येष्ठांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक
कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे ज्या रुग्णांना इतर आजाराची लक्षणे आहेत, अशा रुग्णांना कोरोनापासून अधिक धोका निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नागरिकांसह आजार असणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे.