आकांक्षित शहरे कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील सात ठिकाणे
By राजन मगरुळकर | Published: April 14, 2023 06:58 PM2023-04-14T18:58:40+5:302023-04-14T18:58:56+5:30
अंमलबजावणीसाठी पाच निकषांची होणार तपासणी
परभणी : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित शहरे कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यास नियोजन विभागाने मान्यता दिली आहे. याबाबत नियोजन विभागाने गुरुवारी शासन निर्णय काढला आहे. यात जिल्ह्यातील परभणी महापालिका, पाच नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या सात ठिकाणांची निवड केल्याने येथील विकासकामांवरही चांगला परिणाम होणार आहे.
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात आकांक्षित शहरे कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. याबाबतचे शासन निर्णय अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा यांनी काढले आहेत. केंद्र शासनाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यात राबवावयाच्या आकांक्षित शहर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार नगर विकास विभागाने त्यांच्या आधिपत्याखालील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाअंतर्गत येणाऱ्या शहरांची व निकषांची शिफारस सादर केली होती. यामध्ये प्राप्त झालेल्या शिफारशीनुसार राज्यातील महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायती अशा एकूण ५७ ठिकाणांची निवड केली आहे. या ठिकाणी विविध निकषांची तपासणी करून महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
हे निकष तपासले जाणार...
दरडोई उत्पन्न, पाणीपुरवठा, पक्क्या घरांची टक्केवारी, अनुसूचित जाती-जमाती लोकसंख्या टक्केवारी, जीएफसी स्टार रँकिंग.
निवड केलेल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था
परभणी : ड वर्ग महापालिका
सेलू, जिंतूर : गंगाखेड ब वर्ग नगर परिषदा
मानवत, पाथरी : क वर्ग नगर परिषदा
पालम : नगरपंचायती.