७० टक्क्यांनी घटले कोरोनाचे गंभीर रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:43 AM2020-12-11T04:43:43+5:302020-12-11T04:43:43+5:30
एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांची धास्ती वाढविणारा ठरला. विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांची ...
एप्रिल आणि मे महिन्यात सुरू झालेला कोरोनाचा संसर्ग जिल्हावासीयांची धास्ती वाढविणारा ठरला. विशेष म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने आरोग्य यंत्रणा रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना बरे करण्यासाठी झटत होती. दोन महिन्यांच्या धकाधकीच्या काळात गंभीर प्रकृती झालेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सुरुवातीला जम्बो सिलिंडरच्या सहाय्याने ऑक्सिजनचा वापर करण्यात आला. त्यानंतरही ऑक्सिजनची मागणी वाढत गेल्याने परभणी येथे दोन ठिकाणी लिक्वीड ऑक्सिजनचे प्रकल्प उभारण्यात आले. १ हजार लिटरच्या क्रायोजनिक टँकच्या सहाय्याने रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा केला जात होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने कोरोनासाठी जिल्ह्यातील पीक मंथ ठरले आहेत. या काळात रुग्णांची संख्या दररोज १५० ते २०० पर्यंत पोहचली होती. त्यात गंभीर रुग्णांची संख्या ३५ ते ४० च्या दरम्यान होती. या रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा करावा लागत असे. ही परिस्थिती आता बदलली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून, जे रुग्ण दाखल होत आहेत. त्यांच्यातही कोरोनाची लक्षणे (माॅर्टेलिटी) कमी असल्याने हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सद्यस्थितीला दाखल झालेल्या रुग्णांपैकी केवळ ४ ते ५ रुग्णांनाच ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे २० केएल आणि १० केएल ऑक्सिजन टँकचाच वापर सध्या होत आहे. साधारणत: ७० टक्क्यांनी ऑक्सिजनचा वापर घटला असून, जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब ठरत आहे.
जिल्ह्यात दररोज ४
गंभीर रुग्ण दाखल
जिल्ह्यातील गंभीर रुग्णांचे प्रमाणही घटले आहे. पूर्वी ३५ ते ४० गंभीर रुग्ण दाखल होत होते. हे प्रमाण आता ४ ते ५ रुग्णांवर आले आहे. त्यातही अनेक रुग्णांना फारसा ऑक्सिजनचा पुरवठा करावा लागत नाही. कोरेाना व्यतिरिक्त जिल्हा रुग्णालयात अपघात, असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांना काही प्रमाणात ऑक्सिजन वापरले जाते.
दररोज २० केएल ऑक्सिजन वापर
जिल्ह्यात आता ऑक्सिजन सिलिंडरचा वापर करण्याऐवजी २० व १० केएल सिलिंडर टँक वापरले जात आहेत. ४ ते ५ रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासते. हे प्रमाणही अत्यंत कमी आहे. त्यामुळे १० ते २० केएलच्या टँकचाच वापर होत आहे. त्यातही कोरोना नसलेल्या रुग्णांनाही याच माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने ऑक्सिजनचा वापर मोठ्या प्रमाणात घटला आहे.
ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील रुग्णांची संख्या घटली आहे. गंभीर रुग्णांचे प्रमाणही ४ ते ५ रुग्णांवर येऊन ठेपले आहे. दाखल असलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी असल्याचे जाणवते.
- किशोर सुरवसे
निवासी वैद्यकीय अधिकारी, परभणी