शॉर्टसर्किटने भीषण आग, किराणा दुकानासह शेतमाल जळून १५ लाखांचे नुकसान
By ज्ञानेश्वर भाले | Published: May 27, 2023 05:46 PM2023-05-27T17:46:45+5:302023-05-27T17:46:59+5:30
पहाटे आग लागल्याने शेजारी व ग्रामस्थांना लवकर समजले नाही.
पालम (जि. परभणी) : शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत किराणा दुकानासह शेतमाल जळून खाक झाला. ही घटना पालम तालुक्यातील पेठशिवनी येथे २७ मे रोजी पहाटे ३ वाजता घडली. त्यात १५ लाखांचे नुकसान झाले असून अग्निशमन दल आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
पेठशिवनी येथील धनंजय सुभाष करंजे यांच्या मालकीच्या जागेत विनायक विश्वनाथ गुरव यांचे किराणा दुकाने होते. त्यातील विद्युत वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. पहाटे आग लागल्याने शेजारी व ग्रामस्थांना लवकर समजले नाही. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले. दुकानात तेल, साखर आदी साहित्यामुळे आग वाढत गेली. तिच्या भक्षस्थानी किराणा दुकानाशेजारील खोलीत ठेवलेला २ लाख रुपयांचा शेतमाल जळून खाक झाला. त्याशिवाय, करंजे यांचे घर जुन्या लाकडी जोडणीचे असल्याने त्यांच्या जोडणीनेदेखील पेट घेतला. त्यात करंजे यांचा शेतमाल आणि पत्र्याचे शेड खाक झाले. दरम्यान, ग्रामस्थांनी गंगाखेड येथील अग्निशमन दलास पाचारण केले होते. तत्पूर्वी, गावातील टँकरच्या साहाय्याने १५० ग्रामस्थ आग आटोक्यात आणण्यासाठी परिश्रम घेत होते. त्यामुळे आग आटोक्यात आली. या घटनेत १५ लाख रुपयांचे नुकसान झाले.