महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:13 AM2020-12-27T04:13:08+5:302020-12-27T04:13:08+5:30

जिल्ह्यात वाढले उसाचे क्षेत्र परभणी : यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने उसाचे ...

Sewing machine training for women | महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण

महिलांसाठी शिलाई मशीन प्रशिक्षण

Next

जिल्ह्यात वाढले उसाचे क्षेत्र

परभणी : यावर्षी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाल्याने सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे निम्न दुधना आणि जायकवाडी प्रकल्पातून नियमित पाणी सोडले जात असल्याने सिंचनक्षेत्र वाढले आहेत. परिणामी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे आपला कल वळविला आहे.

रस्त्याच्या कडेने साचला कचरा

परभणी : शहरातील बाजारपेठ भागामध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने कचऱ्याचे ढीग पडले आहेत. कच्छी बाजार, गांधी पार्क या परिसरात मोठ्या कचराकुंडी नसल्याने कचरा रस्त्यावरच साचविला जात आहे. परिणामी, या भागात दुर्गंधी पसरत असून, मनपा प्रशासनाने नियमित कचरा उचलावा, अशी नागरिकांची मागणी आहे.

मोंढ्यातील रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था

परभणी : येथील नवा मोंढा भागात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. चारही बाजूंच्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, शेतमाल घेवून येणाऱ्या वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. बाजार समिती प्रशासनाने या रस्तयांची दुरुस्ती करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

विद्यापीठातील पूल बनला धोकादायक

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून लोहगाव, रायपूर, सायाळा या गावांकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंगळगड नाल्यावरील पूल धोकादायक झाला आहे. या पुलाला दोन्ही बाजूंनी कठडे नसल्याने वाहनधारकांसाठी धोका वाढला आहे.

असुविधांमुळे प्रवाशांमध्ये संताप

परभणी : येथील बसस्थानक परिसरात प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. पिण्याच्या पाण्यासह स्वच्छतागृह आणि सुरक्षेच्या अनुषंगाने सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एसटी महामंडळाने या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी प्रवाशांची मागणी आहे.

बायोमेट्रिक यंत्रणा सहा महिन्यांपासून बंद

परभणी : येथील शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा मागील सहा महिन्यांपासून बंद आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे प्रशासनाने ही यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता हा संसर्ग कमी झाला असला तरी अजूनही बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली नाही.

अतिक्रमणांमुळे रस्ता बनला अरुंद

परभणी : शहरातील मुख्य रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी किरकोळ अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहिलेला नाही. स्टेशन रोड, डनलॉप रोड, जिंतूर रोड, नारायण चाळ या भागात रस्त्यांवरच साहित्य ठेवले जात आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहिला नसून, मनपा व वाहतूक शाखेने हे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.

शासकीय कार्यालये किरायाच्या जागेत

परभणी : जिल्हा प्रशासनाच्या हद्दीतील अनेक शासकीय कार्यालये खाजगी जागांमध्ये चालविली जात आहेत. त्यामुळे वर्षाकाठी लाखो रुपयांचा भूर्दंड प्रशासनाला सहन करावा लागत आहे. येथील प्रशासकीय इमारत परिसरात या कार्यालयांसाठी शासकीय जागा उपलब्ध करून दिल्यास हा भूर्दंड टळू शकतो. मात्र, प्रशासकीय उदासीनतेमुळे या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात शासनाच्या मालकीच्या अनेक जागा उपलब्ध आहेत. त्या जागा कार्यालयासाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Sewing machine training for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.