परभणीच्या वेदशाळेत मुलांवर लैंगिक अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 02:14 AM2018-09-15T02:14:36+5:302018-09-15T02:15:05+5:30
ब्राह्मण समाजात तीव्र संताप; गुन्हा दाखल
मुंबई : परभणी येथील श्री गणेश वेदपाठशाळेत वेदशास्त्रसंपन्न होण्यास शिकणाऱ्या तीन कोवळ्या मुलांवर संस्थाचालकांच्या नात्यातील अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने ब्राह्मण समाजात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पाठशाळेचे संचालक सुधीर कुलकर्णी आणि अन्य दोघांविरुद्ध परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कुलकर्णी यास अटक करण्यात आली आहे.
ज्या तिघांवर लैंगिक अत्याचार झाले त्यांच्या पालकांनी तीनपैकी दोन मुलांना सोबत घेऊन शुक्रवारी परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांची भेट घेऊन अनन्वित अत्याचाराची कहाणी सांगितली. उपाध्याय यांनी लगेच तक्रार दाखल करवून घेण्याचे आदेश दिले. दोन मुलांनी आपबिती सांगितली तेव्हा बयाण तसेच आॅडिओ-व्हिडीओ रेकॉर्डिंग करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीदेखील चक्रावून गेले. ज्याचा प्रचंड लैंगिक छळ झाला असा तिसरा मुलगा त्याच्या गावी इस्पितळात उपचार घेत असून, त्याच्या जखमांवर डॉक्टरांना कितीतरी टाके घालावे लागले आहेत.
अत्याचारग्रस्त मुलांना न्याय मिळावा म्हणून ब्राह्मण समाजातील अनेक वेदशास्रसंपन्न व्यक्ती तसेच पुरोहितांनी परभणीच्या पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. दुसरीकडे समाजातील प्रकरण आपसात मिटवा, असा दबाव पालकांवर आणण्याचेही समाजातीलच काही व्यक्तींकडून प्रयत्न झाले. त्यासाठी परभणीतील एका दोन बड्या लोकप्रतिनिधीला मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न झाला; पण पालकांनी ते धुडकावून लावत त्या लोकप्रतिनिधींना अक्षरश: पिटाळून लावले.
घृणास्पदरीत्या छळ
गेल्या महिन्यापासून या मुलांवर लैंगिक अत्याचार सुरू होते. अत्याचार करणारे दोघेही त्याच शाळेचे विद्यार्थी आहेत. मुलांना नग्न करून उलटे टांगणे, पाइपने जबर मारहाण करणे, गुप्तांगास दोरी बांधून ओढणे असे घृणास्पद प्रकार केले गेले. या प्रकाराकडे संस्थाचालक कुलकर्णी यांनी डोळेझाक केल्याचे पालकांनी तक्रारीत म्हटले.