आयटीआयच्या ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात एसएफआयतर्फे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 03:55 PM2018-05-15T15:55:44+5:302018-05-15T15:55:44+5:30
आयटीआयची आॅनलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने १५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़
परभणी- आयटीआयची आॅनलाईन परीक्षा रद्द करावी, अशी मागणी स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या वतीने १५ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़
आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी यावर्षीपासून आॅनलाईन परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे़ मात्र आयटीआयचे अनेक अभ्यासक्रमांचा संगणकाशी संबंध येत नाही़ तसेच विद्यार्थ्यांना आॅनलाईन परीक्षेचे प्रशिक्षण न देता शासनाने अचानक आॅनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे़ याबाबी लक्षात घेता आॅनलाईन परीक्षा रद्द करावी, तालुका व जिल्हास्तरावरील मुलांचे वसतिगृह सुरू करावे, विद्यावेतन वाढ द्यावी, प्रवेश फिस माफ करावी, नवीन शिक्षकांची भरती करावी, प्रत्येक संस्थेमध्ये पाण्याची व्यवस्था करावी, प्रादेशिक भाषेत प्रश्नपत्रिका द्यावी अशा १२ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़
मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एसएफआयचे कार्यकर्ते, आयटीआयचे विद्यार्थी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात एकत्र आले़ शासनाच्या धोरणाविरूद्ध घोषणाबाजी करीत हे आंदोलन करण्यात आले़. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले़ एसएफआयचे अध्यक्ष शेख नसीर, सचिव शेख सोहेल, दत्ता सोळंके, आकाश राठोड यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते़