'तिला' शिक्षण तर 'त्याला' संसार महत्वाचा होता; संतापलेल्या पतीने शाळेत जाणाऱ्या पत्नीला संपवले

By ज्ञानेश्वर भाले | Published: January 18, 2024 01:27 PM2024-01-18T13:27:02+5:302024-01-18T13:31:26+5:30

धक्कादायक प्रकार, शिक्षणासाठी १६ वर्षीय विवाहिता माहेरी आली; शाळेत जात असताना पतीने केली हत्या

'She' came home for education; Her husband killed her while going to school | 'तिला' शिक्षण तर 'त्याला' संसार महत्वाचा होता; संतापलेल्या पतीने शाळेत जाणाऱ्या पत्नीला संपवले

'तिला' शिक्षण तर 'त्याला' संसार महत्वाचा होता; संतापलेल्या पतीने शाळेत जाणाऱ्या पत्नीला संपवले

बोरी (जि. परभणी) : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे नात्याला काळीमा फासणारी घटना गुरूवारी सकाळी घडली. बोरीतील एका शाळेत नववीत शिकणाऱ्या जयश्री विश्वनाथ वाव्हळ (१६) या मुलीची तिच्याच पतीने धारदार शस्त्राने वार करीत हत्या केल्याची घडली. या घटनेमुळे तालुका हादरून गेला आहे. 

बोरी गावातील संभाजीनगरमध्ये राहाणार जयश्री वव्हळ हिचा विवाह दोन वर्षांपूर्वी धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील राहणार रोहित गायकवाड (२२) याच्याशी झाला होता. जयश्रीला शिक्षणाची आवड असल्याने ती माहेरी बोरी येथे येऊन एका शाळेत नववीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. दरम्यान गुरूवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जयश्री वाव्हळ ही शाळेत जाण्यासाठी निघाली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील रस्त्याने एकटी जात असताना पाठीमागून पती रोहित गायकवाड याने  धारदार शस्त्राने जयश्रीवर वार केले. यात मानेवर व चेहऱ्यावर सपासप वार करीत  गंभीर जखमी केले. यात जयश्री रक्ताच्या थारोळ्यात जागेवर पडली.

घटनेची माहिती मिळताच बोरी पोलिस ठाण्याचे जमादार कृष्णा शहाणे, सय्यद गयासोद्दीन यांनी गंभीर जखमी जयश्रीला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती काळे यांनी तपासणी करून  पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात पाठविले. दरम्यान परभणीतील जिल्हा रुग्णालय दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषित केले. यावेळी सपोनि. सरला गाडेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी पांडुरंग गोफने यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

आराेपी स्वत: पोलिस ठाण्यात 
घटनेनंतर रोहित गायकवाड हा पोलिस ठाण्यात हजर झाला. यावेळी वारंवार सांगूनही पत्नी जयश्री ही आपल्या सोबत राहायला तयार होत नसल्याने आपण रागाच्या भरात आपण तिचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले.
 

Web Title: 'She' came home for education; Her husband killed her while going to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.