'ती' बुद्ध नव्हे सिद्धमूर्ती; तलावातील गाळात सापडलेल्या अवशेषांबद्दल अभ्यासकांचा दावा
By ज्ञानेश्वर भाले | Published: June 22, 2023 11:16 AM2023-06-22T11:16:37+5:302023-06-22T11:20:01+5:30
भगवान गौतम बुद्धांचीही अशा प्रकारची मूर्ती कुठे दिसत नाही. त्यामुळे हे शिल्प नाथ संप्रदायातील सिद्ध शिल्प असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
जिंतूर (जि.परभणी) : तालुक्यातील मानकेश्वर येथे खोदकाम करीत असताना सापडलेले शिल्प हे बुद्धमूर्ती नसून सिद्धमूर्ती असल्याची शक्यता असून, इतिहास संशोधक येत्या दोन दिवसांत त्या ठिकाणी भेट देणार आहेत. तालुक्यातील मानकेश्वरमध्ये १८ जूनला पाझर तलावातील गाळ काढत असताना प्राचीन मूर्ती व कोरीव खांब आढळून आले असून, शास्त्रीय पद्धतीने उत्खनन केले जाणार आहे.
प्रथमदर्शनी ही बुद्धमूर्ती असावी असे भासत होते. परंतु, नाथ संप्रदायातील ती सिद्धमूर्ती असावी, असे बोलले जात आहे. विशेष म्हणजे सिद्धांपैकी अनेक मूर्ती या योगशास्त्राशी संबंधित असतात. या भागामध्ये उत्तर चालुक्य यांच्या राजवटीत त्या स्थापन झालेल्या असू शकतात. चाणक्य राष्ट्रकुट यादव काळात जैन आणि हिंदू मंदिरे निर्माण झाली होती. लेणी स्थापत्य वगळता बौद्ध धर्मीय अवशेष कुठेही आढळत नाहीत. शिवाच्या मंदिरात सिद्धाचे अंकन आढळून येते. आदिनाथ अर्थात शिव आणि त्याचे ८४ सिद्ध मंदिरावर दिसून येतात. मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांचीदेखील शिल्पे अनेक भागांत आहेत. चारठाणा, डेंगळे पिंपळगाव, हत्ता, उटी येथे अशी शिल्पे आहेत. मुळात ही मूर्ती हाट योगातील अनेक मुद्रांपैकी एक सिद्ध मुद्रा आहे. मुद्रा साम्यांमुळे लोकांना ती बुद्धमूर्ती वाटत आहे. प्रत्यक्षात ती सिद्धमूर्ती आहे. सहाव्या शतकातील मंदिर असून, ४० वर्षांपूर्वी मंदिराच्या बाजूला तलाव निर्माण झाला त्यावेळी ही शिल्पे गाडली गेली असावीत, अशी शक्यता आहे.
ते शिल्प नेमके कोणते?
यासंदर्भामध्ये अंतरंग रचनेची शीळ ध्यान अवस्थेतील आहे. जैन, बौद्ध आणि हिंदू धर्मात अशी शिल्पे असतात. परंतु जैन तीर्थंकरांपैकी अशा मुद्रेमध्ये कोणतीच मूर्ती आढळत नाही. भगवान गौतम बुद्धांचीही अशा प्रकारची मूर्ती कुठे दिसत नाही. त्यामुळे हे शिल्प नाथ संप्रदायातील सिद्ध शिल्प असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.
मंदिरातील शिल्प असू शकते
या भागामध्ये बुद्ध मंदिर किंवा बुद्ध लेणी संदर्भात कुठलीही माहिती उपलब्ध नाही. हे शिवालय असू शकते. शिवालयाच्या गर्भगृह, उपदेवता अशा पद्धतीच्या मंदिरातील हे शिल्प असू शकते. त्या भागामध्ये नवग्रह पॅनल आढळून आले आहेत. शिवाय कामशिल्प, प्रसूतिशिल्प आढळून आल्याने अशा प्रकारची शिल्पे मराठवाड्याच्या अनेक मंदिरांजवळ उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणीही मंदिरच असावे व ती मूर्ती सिद्धमूर्ती असण्याची शक्यता आहे.
- कांतराव सोनवटकर, मूर्तिशास्त्र अभ्यासक