शिवसैनिकांनी घातले महापालिकेचे श्राद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:20 AM2021-09-21T04:20:17+5:302021-09-21T04:20:17+5:30
परभणी : महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरच पिंडदान करून श्राद्ध घालत २० सप्टेंबर रोजी शिवसैनिकांनी मनपाच्या कारभाराचा निषेध नोंदविला आहे. शहरातील रस्त्यांची ...
परभणी : महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरच पिंडदान करून श्राद्ध घालत २० सप्टेंबर रोजी शिवसैनिकांनी मनपाच्या कारभाराचा निषेध नोंदविला आहे.
शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली आहे. त्याचप्रमाणे वाहतुकीचा प्रश्नही महापालिकेकडून सोडविला जात नाही. खराब रस्त्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. तेव्हा रस्त्यांचा प्रश्न सोडवावा, खड्डे बुजवावेत तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी बाजारपेठ भागात वाहनतळाची व्यवस्था करावी, अशी मागणी शिवसैनिकांनी वेळोवेळी केली होती; परंतु मनपाने कोणतीच कारवाई केली नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मनपा कार्यालयासमोर पिंडदान करीत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. त्यामुळे कार्यालयासमोरच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आयुक्त देविदास पवार यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. या आंदोलनात शिवसेना महिला आघाडीच्या अंबिका डहाळे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर पवार, नगरसेवक चंदू शिंदे, मारुती तिथे, संभानाथ काळे काळे, बाळराजे तळेकर, मकरंद कुलकर्णी, गोपाळ कदम आदी सहभागी झाले होते.