शिवसेना आमदार राहुल पाटील यांचे स्पष्टीकरण, मी मुंबईतच आहे, गुवाहाटीला गेलेलो नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 07:16 PM2022-06-27T19:16:58+5:302022-06-27T19:17:46+5:30
आमदार राहुल पाटील सुरतमार्गे विमानाने गुवाहाटीला जाणार असून शिंदे गटात सामील होणार असल्याची अफवा पसरली होती.
परभणी: शिवसेनेला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज मोठा धक्का बसला आहे. त्यातच परभणीचे आमदार राहुल पाटील नॉट रिचेबल असल्याची अफवा पसरल्याने ते शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या.मात्र, एक जीवन एक नेता, अशा भावना व्यक्त करणारे आ. राहुल पाटील यांनी मी मुंबईतच असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मागील एक आठवड्यापासून राजकीय भूकंप आला आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेत उभी फुट पाडली आहे. मुंबई, ठाणे नंतर सेनेचा बालेकिल्ला असलेल्या मराठवाड्यातून तब्बल ९ आमदार शिंदे गटात गेले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील उदयसिंग राजपूत, परभणीचे राहुल पाटील, हिंगोलीतील संतोष बांगर आणि उस्मानाबादचे कैलास पाटील हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम आहेत. दरम्यान, आज सायंकाळी आमदार राहुल पाटील यांचा फोन दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असून ते गुवाहाटीला जाण्याच्या तयारीत असल्याची अफवा पसरली. पाटील सुरत मार्गे विमानाने गुवाहाटीला जाणार असून शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरु झाली. यामुळे आज दुपारी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सेनेला आणखी एक धक्का बसल्याचे मानले जात होते. शिंदे गटात पाटील जाणार याची चर्चा सुरु असतानाचा आमदार राहुल पाटील यांनी मी मुंबईतच आहे.पक्षाची गद्दारी करणार नाही, अशी प्रतिक्रिया माध्यमांना लागलीच दिली. यामुळे पाटील बंडखोरांच्या गटात जाणार या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
ज्याने शिवसेना सोडली त्याला जनतेने सोडले...
शिवसेनेच्या तिकिटावर जे निवडून आले त्यापैकी ज्यांनी सेना सोडली त्यांना जनतेनेच सोडून दिल्याचा आजवर जिल्ह्याचा इतिहास आहे. त्यामुळेच ‘परभणीकरांची रीतच न्यारी’ अशी म्हण राजकीय वर्तुळात चर्चेत येत आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार धोक्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात ५ वेळा शिवसेनेत फूट पडली आहे. असे असताना परभणीतही शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या नेत्यांनी सेना सोडून निवडणूक लढल्यानंतर मात्र राजकारणात यश मिळाले नसल्याचा इतिहास पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.