विप्लव बाजोरिया यांना शिवसेनेची उमेदवारी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2018 02:22 PM2018-04-29T14:22:50+5:302018-04-29T16:49:28+5:30

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली आहे.

Shiv Sena's candidature for Vipalav Bajoria | विप्लव बाजोरिया यांना शिवसेनेची उमेदवारी 

विप्लव बाजोरिया यांना शिवसेनेची उमेदवारी 

googlenewsNext

परभणी- परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून शिवसेनेने अकोल्याचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांचे पुत्र विप्लव बाजोरिया यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली आहे. या संदर्भातील एबी फॉर्म पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाजोरिया यांना प्रदान केला. परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे.

या दहा दिवसांमध्ये एकाही राजकीय पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नव्हता. पूर्वी शिवसेना-भाजपा युतीतील वाट्यानुसार परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा भाजपाच्या वाट्याला आलेली होती. त्यामुळे गेल्या निवडणुकांमध्ये भाजपाच्याच उमेदवारांनी येथून युतीचे नेतृत्व केले होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपामध्ये निर्माण झालेल्या वादानंतर शिवसेनेने आता युती न करता ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. त्या अनुषंगाने परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आपला स्वतंत्र उमेदवार उतरविण्याची तयारी शिवसेनेने चालविली होती. यासाठी वाशिम-बुलडाणा-अकोला स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आ. गोपीकिशन बाजोरिया यांची या मतदारसंघात प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती. त्यानुसार बाजोरिया यांनी त्यांचे पुत्र विप्लव यांनाच या निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयावर रविवारी मुंबईत मातोश्रीवर शिक्कामोर्तब झाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विप्लव बाजोरिया यांना पक्षाचा एबी फॉर्म प्रदान केला. यावेळी शिवसेनेचे सचिव खा. अनिल देसाई, खा. बंडू जाधव, आ. गोपीकिशन बाजोरिया, वसमतचे आ. जयप्रकाश मुंदडा, परभणीचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, संजय कच्छवे, हिंगोलीचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर आदींची उपस्थिती होती. यावेळी स्थानिक पदाधिका-यांनी बाजोरिया यांना निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

दरम्यान, शिवसेनेने बाजोरिया यांना उमेदवारी जाहीर करून भाजपालाच कोंडीत पकडले आहे. भाजपाकडे दोन्ही जिल्ह्यात मिळून फक्त ५१ सदस्यांचे संख्याबळ आहे. अशात भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी असा तिरंगी मुकाबला झाल्यास सध्याच्या संख्याबळानुसार भाजपाची दयनीय अवस्था होऊ शकते. त्यामुळे भाजपा जिल्ह्यातीलच इच्छुकांना उमेदवारी देते की शिवसेनेसारखा आर्थिकदृष्ट्या तगडा असलेला परजिल्ह्यातील उमेदवार मतदारसंघात उतरवून चुरस निर्माण करते, याकडे परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Shiv Sena's candidature for Vipalav Bajoria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.