परभणीत रमाई घरकुलांसाठी शिवसेनेचे घेराव आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 03:39 PM2018-06-30T15:39:01+5:302018-06-30T15:40:28+5:30
: रमाई घरकूल योजनेंतर्गत ५३ कोटी रुपयांचा निधी वर्षभरापासून पडून आहे.
परभणी : रमाई घरकूल योजनेंतर्गत ५३ कोटी रुपयांचा निधी वर्षभरापासून पडून आहे. यामुळे गोरगरीबांना घरकुलाचा लाभ मिळत नसल्याने आज दुपारी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेसमोर शिवसेनेच्या वतीने घेराव आंदोलन करण्यात आले़
शहरातील गोरगरीब मागासवर्गीय लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी रमाई घरकूल योजनेंतर्गत प्रतिलाभार्थी २ लाख ५० हजार रुपये या प्रमाणे मागील वर्षात ४५ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त झाले़ परंतु, वर्षभर एकाही लाभार्थ्याला योजनेचा लाभ मिळाला नाही़ त्यामुळे या प्रश्नावर शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता़ आज सकाळपासूनच शहरातील विविध भागांमधून लाभार्थी महिला, पुरुष मोर्चाद्वारे महापालिकेच्या कार्यालयासमोर दाखल झाले़ दुपारी १ वाजेच्या सुमारास घेराव आंदोलनास प्रारंभ झाला़
यावेळी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ़ विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हाप्रमुख सदाशिव देशमुख, संजय गाडगे, गटनेते चंद्रकांत शिंदे, नगरसेवक सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, माजी विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे, नंदू पाटील, नंदू आवचार, रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे यांची प्रमुख उपस्थिती होती़
१५ दिवसांत घरकुलाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही तर या पुढे आणखी तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी दिला़ तसेच परभणी शहरातील सर्व झोपडपट्ट्या नियमित करण्यासाठीही आपण विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले़ या आंदोलनात परभणी शहरातील विविध भागांमधील लाभधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते़