शिवरायांना मानवंदना ! 9 हजार 388 चौरस फुटाची साकारली भव्य शिवप्रतिमा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2018 10:26 PM2018-02-17T22:26:14+5:302018-02-17T23:09:25+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल 9 हजार 388 चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे.
परभणी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जिंतूर शहारात शिवगर्जना प्रतिष्ठानने तब्बल 9 हजार 388 चौरस फुटाची शिवप्रतिमा साकारली आहे. रांगोळीच्या सहाय्यानं शिवरायांची ही भव्यदिव्य प्रतिमा साकारण्यात आली आहे. महाराजांची ही आखीवरेखीव प्रतिमा साकारताना कलाकार ज्ञानेश्वर बर्वे यांना वादळी पाऊस, गारपिटीच्या विघ्नाचा सामना करावा लागला. मात्र, महाराजांना अनोख्या पद्धतीनं मानवंदना देण्याची जिद्द बाळगलेल्या ज्ञानेश्वर यांनी नैसर्गिक आपत्तीसमोर न झुकता त्यांची सुंदर प्रतिमा अखेर अथक परिश्रमातून पूर्ण केली.
ज्ञानेश्वर यांच्याकडून चार दिवसांपूर्वीही हा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र अवकाळी पाऊस व गारपिटीच्या फटक्यामुळे महाजारांची रेखाटलेली भव्य रांगोळी वाहून गेली. यानंतर सलग दोन दिवस अथक मेहनत घेऊन ज्ञानेश्वर यांनी पुन्हा छत्रपतींची विलोभनीय व भव्यदिव्य प्रतिमा साकारण्याचा प्रयत्न केला व तो प्रत्यक्षात उतरवून विक्रमही नोंदवला. त्यांनी साकारलेल्या या मनमोहक कलाकृतीचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ही मनमोहक प्रतिमा पाहण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक प्रचंड गर्दी करत आहे .