शिवाजी चौकामध्ये सर्वाधिक वर्दळ, वाहनांच्या गर्दीत पायी चालायचे कसे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:13 AM2021-07-19T04:13:25+5:302021-07-19T04:13:25+5:30
शिवाजी चौक परिसरात सरकारी दवाखाना, नानलपेठ, गुजरी बाजार, जनता मार्केट या भागातून येण्यासाठी चार रस्ते आहेत. शिवाजी चौकात अनेक ...
शिवाजी चौक परिसरात सरकारी दवाखाना, नानलपेठ, गुजरी बाजार, जनता मार्केट या भागातून येण्यासाठी चार रस्ते आहेत. शिवाजी चौकात अनेक व्यापारी प्रतिष्ठाने, तसेच दुचाकी वाहने उभी करण्यासाठी अपुरी जागा असल्याने या ठिकाणी वाहनधारकांची गर्दी होते. बाजारपेठेत सकाळपासून ही गर्दी नित्याचीच झाली आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. याकडे मनपा व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या भागातील कोंडी सोडवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हजारो लोकांची रोज ये-जा
शिवाजी चौकात शहरातील हजारो लोकांची रोज ये-जा असते. या परिसरात व्यापारी प्रतिष्ठाने, बँक, शाळा, महाविद्यालय, तसेच भाजीपाला मार्केट व अन्य दुकाने आहेत. यामुळे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी नागरिकांची वर्दळ असते. मात्र, या ठिकाणी आलेल्या नागरिकांना वाहनांच्या कोडीत पायी चालणे, तसेच दुचाकीवरून जाणे कठीण होऊन बसले आहे. चारचाकी वाहने या भागात आणल्यास बराच वेळ वाहन या भागातून बाहेर काढण्यासाठी लागतो.
पादचारी पथ नसल्याने अडचण
शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, तसेच जनता मार्केट, क्रांती चौक या भागांमध्ये पायी चालणे कठीण होऊन बसले आहे. वाहनांच्या कोंडीत येथे ये-जा करताना अडथळा निर्माण होतो. या ठिकाणी पादचारी पथ नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
अतिक्रमण हटाव केवळ दाखवायलाच
या भागात झालेले किरकोळ अतिक्रमण मनपाच्या नजरेतून दुर्लक्षित आहेत. यामुळे रस्त्यावर अनेक हातगाडे, साहित्य विक्री करणारे किरकोळ व्यापारी, तसेच काही पक्की अतिक्रमणे यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामुळे पायी चालणे कठीण होऊन बसले आहे. मनपाच्या वतीने अनेक वर्षांपासून तयार केलेले अतिक्रमण हटाव पथक केवळ दाखवायलाच आहे की काय? अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.
या रस्त्यांवर कोंडी
जनता मार्केट- शिवाजी चौक
शिवाजी चौक-नानलपेठ
गुजरी बाजार - शिवाजी चौक
शिवाजी चौक - सरकारी दवाखाना
अधिकाऱ्यांची बघ्यांची भूमिका
मनपाच्या वरिष्ठ किंवा प्रभाग समिती सहायक आयुक्त आणि स्वच्छता निरीक्षक यांच्यासह पोलिसांचे या गर्दीमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे अधिकारी-लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प राहून केवळ बघ्यांची भूमिका घेतात.
पायी चालायची भीती
बाजारात येताना दुचाकी आणल्यास वाहतूक कोंडीत वेळ जातो, तर पायी आल्यास चालताना भीती वाटते. या दोन्ही स्थितीत काम असेल तरच शिवाजी चौकात येतो, अन्यथा इतर भागातून खरेदी करून येथे येणे टाळतो.
- यशवंत कुलकर्णी, नागरिक.