परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे बँकांसमोर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 04:02 PM2018-06-25T16:02:23+5:302018-06-25T16:06:36+5:30
शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी 11 वाजेपासून जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.
परभणी : शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने आज सकाळी 11 वाजेपासून जिल्हाभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज तत्काळ वाटप करावे, पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, कर्जमाफीची रक्कम विना अट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, आॅनलाईन सातबारा काढताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे तलाठ्यांच्या हस्तलिखित सातबारा व होल्डींग पीक कर्जासाठी बँक प्रशासनाने स्वीकाराव्यात, या मागणीसाठी परभणी, पालम, मानवत, सोनपेठ, बोरी, येलदरी, गंगाखेड, सेलू या ठिकाणी शिवसैनिकांनी आज सकाळी ११ वाजेपासून खा.संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली बँकांसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आदोलकांनी बँकेचे शाखा व्यवस्थापक व तहसील कार्यालयात मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, बँक प्रशासनाचा निषेध असो, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. त्यानंतर शिवसैनिकांच्या वतीने बँक व्यवस्थापक व तहसील प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सदाशीव देशमुख, अर्जून सामाले, दिलीप आवचार, माणिक पोंढे, संदीप भंडारी, रावसाहेब रेंगे, अतुल सरोदे, संजय सारणीकर, जनार्दन सोनवणे, बाळासाहेब पारवेकर, वसंतराव रेंगे, मारोतराव इक्कर, रामराव रसाळ आदींसह हजारो शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता.