शेतक-यांना महावितरणचा ‘शॉक’; १० हजार कृषिपंपांची तोडली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 12:38 PM2017-11-04T12:38:52+5:302017-11-04T12:42:06+5:30

वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत येणा-या १० हजार २६९ शेतक-यांच्या कृषीपंपाची वीज थकबाकी वसुलीच्या नावाखाली तोडली आहे.

'Shock' of MSEDCL to farmers; 10 thousand agricultural power plants | शेतक-यांना महावितरणचा ‘शॉक’; १० हजार कृषिपंपांची तोडली वीज

शेतक-यांना महावितरणचा ‘शॉक’; १० हजार कृषिपंपांची तोडली वीज

googlenewsNext
ठळक मुद्दे जिल्ह्यामध्ये ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. हे शेतकरी दरवर्षी रबी हंगामात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करतात. जिल्ह्यामध्ये महावितरणचे ९२ हजार ८८० कृषीपंपधारक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची गेल्या अनेक वर्षांपासून ७५० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

- मारोती जुंबडे

परभणी : वीज वितरण कंपनीने जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत येणा-या १० हजार २६९ शेतक-यांच्या कृषीपंपाची वीज थकबाकी वसुलीच्या नावाखाली तोडली आहे. त्यामुळे ऐन रबी हंगामाच्या तोंडावर महावितरणने केलेल्या कारवाईमुळे शेतक-यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोगही पिकांना होईनासा झाला आहे. त्यामुळे शेतक-यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात कृषी हंगाम हा शेतक-यांची अर्थवाहिनी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या हंगामावर शेतक-यांची भिस्त असते. जिल्ह्यामध्ये ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. हे शेतकरी दरवर्षी रबी हंगामात अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी करतात. गतवर्षी जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे खरीप व रबी हंगामात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली. शेतक-यांनी विक्रमी उत्पन्न घेतले आहे. 

यावर्षीच्या रबी हंगामात कृषी विभागाने २ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या परतीच्या पावसाच्या ओलाव्यावर शेतक-यांनी रबी हंगामातील ज्वारी, करडई, हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. जवळपास ६० हजार हेक्टरवर जिल्ह्यात पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु, याच हंगामातील गहू, भूईमुग, सूर्यफुल आदी पिकांची पेरणी करण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. सध्या बहुतांश शेतक-यांकडे विहीर, बोअर, नदी, नाले, ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु, या पाण्याचा उपयोग घेण्यासाठी शेतक-यांना विजेची गरज भासते. 

जिल्ह्यामध्ये महावितरणचे ९२ हजार ८८० कृषीपंपधारक आहेत. त्यांच्याकडे महावितरणची गेल्या अनेक वर्षांपासून ७५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये परभणी ग्रामीण उपविभागात १६ हजार ६६७ कृषीपंपधारकांकडे १४३ कोटी २ लाख रुपयांची थकबाकी आहे.  परभणी शहर उपविभागात ६५१ ग्राहकांकडे ५ कोटी ७७ लाख, पाथरी १० हजार १८३ ग्राहकांकडे ८४ कोटी ५९ लाख, पूर्णा १० हजार ६०६ ग्राहकांकडे ८४ कोटी ७८ लाख, गंगाखेड उपविभागात ८ हजार ८५० ग्राहकांकडे ६५ कोटी ९० लाख, जिंतूर १७ हजार २२७ कृषीपंपधारकांकडे १६८ कोटी ९३ लाख, मानवत ७ हजार ९१३ ग्राहकांकडे ६७ कोटी ५० लाख, पालम ५ हजार ९५० ग्राहकांकडे ४३ कोटी ४२ लाख, सोनपेठ ४ हजार ७०४ ग्राहकांकडे ३७ कोटी ३४ लाख असे एकूण ९२ हजार ८८० ग्राहकांकडे ७५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीच्या नावाखाली २६ आॅक्टोबरपासून कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम वीज वितरण कंपनीने हाती घेतली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी  अडचणीत सापडले आहेत. परतीच्या पावसाने रबी हंगामातील पिके बहरतील व उत्पादनात विक्रमी वाढ होईल, या अपेक्षेवर शेतकरी असताना महावितरणने शेतक-यांच्या या आशेवर पाणी फिरवत चक्क रबी हंगामाच्या तोंडावर कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करुन एक प्रकारे शॉक देण्याचे कामच सुरू केले आहे.

शेतक-यांच्या माथी मारली जातात अंदाजेच बिले

जिल्ह्यात ३ लाख ४७ हजार शेतकरी आहेत. त्यापैकी ९२ हजार ८८० शेतक-यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन अधिकृतरित्या वीज वितरण कंपनीकडून आपल्या कृषीपंपासाठी वीज पुरवठा घेतला आहे. या शेतक-यांना विजेच्या मोबदल्यात महिन्याकाठी वीज बिल दिले जाते. परंतु, सध्या कोणत्याच शेतक-यांच्या बांधावर जावून वीज वापराचे रिडींग घेतले जात नाही.  संबंधित एजन्सी घरी बसूनच शेतक-यांच्या कृषीपंपाची रिडींग बिलावर अंदाजे टाकते. तसेच चार ते पाच महिने शेतक-यांना बिले मिळत नाहीत. त्यामुळे आपल्या कृषीपंपाला किती बिल आले आहे, हे सुद्धा शेतक-यांना माहिती होत नाही. त्यामुळे महावितरणच्या थकबाकीचा डोंगर वाढत आहे. परंतु, याकडे वरिष्ठ अधिका-यांचे दुर्लक्ष झाले आहे. केवळ थकबाकीचा डोंगर वाढला म्हणून कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. परंतु, याचा सर्वात मोठा शेतक-यांना बसत आहे. त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

उपविभागनिहाय खंडित केलेली  वीज जोडणी
येथील वीज वितरण कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील १० उपविभागांतर्गत ९२ हजार ८८० वीज ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. २६ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत महावितरणने १० हजार २६९ कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित केला आहे. यामध्ये परभणी शहर २२१, पाथरी उपविभागांतर्गत ७४५, पूर्णा उपविभागांतर्गत १६८, गंगाखेड उपविभागांतर्गत १८८२, जिंतूर १४२०, सेलू ५१४, सोनपेठ ९८९, पालम ११८, मानवत ५४० तसेच परभणी ग्रामीण अंतर्गत तब्बल ३ हजार ३७२ कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांकडे महावितरणची ४९ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. तसेच यापैकी ५७२ ग्राहकांनी १४ लाख रुपयांचा वीज बिल भरणा करुन वीज जोडणी पूर्ववत केली आहे.

गव्हाच्या पेरणीत होणार घट 
यावर्षी जिल्हा कृषी कार्यालयाने २ लाख ७७ हजार ३६७ हेक्टर क्षेत्रावर रबी हंगामाच्या पेरणीचे नियोजन केले आहे. त्यापैकी ३० हजार ४७६ हेक्टर क्षेत्र हे गव्हासाठी नियोजित ठेवण्यात आले आहे. परंतु, गव्हाचे पीक घेण्यासाठी शेतक-यांना मूबलक प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. सध्या जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतक-यांकडे मूबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. परंतु, महावितरणने ऐन पेरणीच्या हंगामातच शेतक-यांच्या कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करणे सुरु केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी गव्हाऐवजी ज्वारीचा पर्याय निवडून ज्वारीची पेरणी करीत आहेत. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या गव्हाच्या पेरणीत मोठ्या प्रमाणात घट        होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संघटना, पक्षांच्या वतीने प्रशासनाला निवेदन
ऐन रबी हंगामात वीज वितरण कंपनीने वीज बिल वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरु केले आहे. या मोहिमेला स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना यांनी कडाडून विरोध केला आहे. सध्या रबी हंगामातील गव्हाची पेरणी सुरु आहे. त्यामुळे महावितरणने कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र बंद करुन पंपाला २४ तास वीज पुरवठा करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटना आदींनी  जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर माणिक कदम, भास्कर खटींग, शेख जाफर तरोडेकर, भगवान शिंदे, किशोर ढगे, केशव आरमळ, अमृत शिंदे, अनंत कदम, मुंजाभाऊ कदम, माऊली कदम, रोहिदास हारकळ, सुनील कदम आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम बंद
शासनाच्या आदेशानुसार सध्या १५ नोव्हेंबरपर्यंत कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम बंद केली आहे. त्यामुळे कृषीपंपधारकांनी आपल्याकडील थकबाकी वेळेत कार्यालयात जमा करावी. ज्या कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यांनी आपल्याकडील थकबाकी जमा करावी.
- कापसे, कार्यकारी अभियंता

Web Title: 'Shock' of MSEDCL to farmers; 10 thousand agricultural power plants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.