धक्कादायक ! ३ खाजगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून ५१ लाख उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 06:23 PM2020-10-23T18:23:12+5:302020-10-23T19:08:40+5:30
जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनांना पत्र पाठवून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्याचे निर्देश दिले.
परभणी : जिल्ह्यातील तीन खाजगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांकडून उपचारासाठी अतिरिक्त ५१ लाख रुपयांची रक्कम वसूल केल्याची बाब तपासणीत समोर आली असून, ही रक्कम संबंधित रुग्णांना परत करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांमध्येही बाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. त्यानुसार काही खाजगी रुग्णालयांमध्ये उपचाराची ही सुविधा निर्माण करण्यात आली. मात्र शासनाने ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा अधिक रक्कम रुग्णांकडून वसूल केली जात असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाल्यानंतर या प्रकरणात चौकशीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली.
प्राप्त तक्रारीनुसार या समितीने परभणी शहरातील खाजगी रुग्णालयांच्या अभिलेखांची तपासणी केली असता ३ खाजगी रुग्णालयांनी शासकीय दराच्या तुलनेत रुग्णांकडून सुमारे ५१ लाख रुपयांची रक्कम वसूल केल्याची बाब तपासणीत स्पष्ट झाली. तपासणीसाठी स्थापन केलेल्या समितीने हा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी या रुग्णालयाच्या व्यवस्थापनांना पत्र पाठवून अतिरिक्त वसूल केलेली रक्कम संबंधित रुग्णांना परत करुन तसा अहवाल पाठविण्याचे निर्देश काही दिवसांपूर्वी दिले आहेत. सध्यास्थितीत तरी ही रक्कम या रुग्णालयांनी परत केलेली नाही.
समितीच्या तपासणीत काय आढळले?
कोरोनाबाधित रुग्णांकडून शासकीय दरापेक्षा अधिक रक्कम वसूल केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर या प्रकरणात समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने तीन रुग्णालयातील बिलांच्या अभिलेखांची तपासणी केली. त्यात प्राईम हॉस्पिटलमध्ये १२ लाख ७७ हजार ४८८ रुपये रुग्णांकडून अधिक वसूल केले. त्याचप्रमाणे चिरायू हॉस्पिटलने ३२ लाख ४५ हजार ९१० रुपये तर परभणी आयसीयू या रुग्णालयाने ५ लाख ६७ हजार ९०० रुपये रुग्णांकडून अतिरक्त वसूल केल्याचे अहवालात म्हटले आहे. जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांतील रुग्णांच्या बिलांची समितीने तपासणी केली आहे.
कोरोनाबाधित रुग्णांकडून वसूल केलेली अतिरिक्त रक्कम रुग्णांना परत करण्याच्या सूचना खाजगी रुग्णालयांना केल्या आहेत. रुग्णालयांनी ही रक्कम रुग्णांना परत करणे बंधनकारक आहे. या संदर्भात रुग्णालयांकडे पाठपुरावा सुरू आहे.
-दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी
आदेशानुसार रुग्णालयांची तपासणी
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील खाजगी कोरोना रुग्णालयांची तपासणी केली. त्यात ज्या बाबी आढळल्या त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. रुग्णालयांनी अतिरिक्त वसूल केलेली रक्कम रुग्णांना परत करायला हवी. रुग्ण ही रक्कम स्वीकारत नसतील तर कोविड-१९ साठी शासनाकडे जमा करण्याचे आवश्यक आहे.
-ज्योती बगाटे, प्रमुख चौकशी अधिकारी.