धक्कादायक! युवकाचा पॅन क्रमांक वापरून ७८ कोटींचे व्यवहार, परभणी शहरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 09:06 PM2022-04-06T21:06:45+5:302022-04-06T21:06:55+5:30
नोंदणी करताना उघड झाली बाब, युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल.
परभणी : येथील एका युवकाचा पॅन क्रमांक वापरुन तयार केलेल्या बनावट जीएसटी नोंदणी क्रमांकावरून तब्बल ७८ कोटी रुपयांचा व्यवहार केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी त्या युवकाने दिलेल्या तक्रारीवरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
परभणीतील निखिल नंदकुमार तारे यांना नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्याने ३० मार्च रोजी ते जीएसटी नोंदणी करीत होते. ही नोंदणी करत असताना आयकर विभागाच्या पोर्टलवर यापूर्वीच त्यांच्या पॅन क्रमांकावर नोंदणी झाल्याची बाब निदर्शनास आली. सनवारीया इस्पात इंडस्ट्री या नावाने ही नोंदणी झाली होती. बनावट कागदपत्रांचा वापर करून व आपले पॅन क्रमांक वापरून या जीएसटी नोंदणी क्रमांकावरून २०१९-२० मध्ये ४ कोटी ७५ लाख २१ हजार ९४३ रुपये, २०२०-२१ मध्ये ३१ कोटी २६ लाख ६५ हजार ४४८ रुपये आणि २०२१-२२ मध्ये ४२ कोटी १६ लाख ८९ हजार २४० रुपये असा ७८ कोटी १८ लाख ७३ हजार ७५५ रुपयांचा व्यवहार या क्रमांकावरून झाल्याचेही निदर्शनास आले.
याप्रकरणी निखिल तारे यांनी ५ एप्रिल रोजी नवामोंढा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. आपले पॅन कार्ड व अज्ञात व्यक्तीचा फोटो वापरून व इतर कागदपत्रांचा वापर करून बनावट जीएसटी नोंदणी क्रमांक तयार करीत आर्थिक व्यवहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून नवा मोंढा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.