धक्कादायक ! दुसऱ्या स्वॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर प्रलंबित पहिल्याचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 12:12 PM2020-06-04T12:12:04+5:302020-06-04T12:12:44+5:30
पहिला रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला असला तरी यापूर्वीच 26 मे रोजी दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेतील गोंधळ समोर आला आहे.
पाथरी : 21 मे रोजी पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आलेल्या तालुक्यातील रामपुरी येथील महिलेचा पहिल्या स्वॅबचा प्रलंबित रिपोर्ट तब्बल 14 दिवसानंतर काल रात्री पॉझिटिव्ह आला. तत्पूर्वी 24 मे रोजी घेतलेल्या दुसऱ्या स्वॅबचा रिपोर्ट 26 मे रोजी निगेटिव्ह आल्याने घरीच सोडण्यात आल्याने गोंधळात भर पडली आहे. दरम्यान, या महिलेला 4 जून च्या पहाटे आरोग्य विभागाने गावातून हलवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.तर प्रशासनाने परिसर सील केला आहे.
पाथरी तालुक्यातील रामपुरी खु येथील एक महिला मुंबई येथून 20 मे रोजी टेम्पोमधून गावी आली होती. गावात आल्यानंतर सदर महिला घरी राहत असल्याने काही ग्रामस्थांनी या महिलेस क्वारंटीन करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर 21 मे रोजी सायंकाळी तहसीलदार एन यु कागणे यांनी या महिलेस गावातून हलवत पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. त्याच रात्री आरोग्य विभागाने महिलेचा स्वॅब घेतला होता, 24 मे रोजी पाठवलेल्या स्वॅबचा रिपोर्ट अनिर्णयाक आल्यामुळे पुन्हा दुसरा स्वॅब 24 मे रोजी घेण्यात आला. 26 मे रोजी रिपोर्ट निगेटिव्ह आला, त्या नंतर 28 मे रोजी या महिलेला सुटी देण्यात येऊन घरात क्वारंटीन करण्यात आले. येथपर्यंत सगळी प्रक्रिया ठीक होती.
मात्र, या महिलेचा 21 मे रोजी घेतलेल्या पहिल्या स्वॅबचा रिपोर्ट 3 जून रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली. पहाटे या महिलेला ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे. पहिला रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला असला तरी यापूर्वीच 26 मे रोजी दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेतील गोंधळ समोर आला आहे. दरम्यान रामपुरी बु गाव परिसर प्रशासनाने सील केला आहे.