धक्कादायक ! तान्ह्या बाळास नेणारी रुग्णवाहिका रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरमुळे अर्ध्या रस्त्यातून परतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:33 PM2019-07-01T12:33:05+5:302019-07-01T12:38:24+5:30
कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला.
बोरी (जि.परभणी) : अत्यवस्थ रुग्णाला परभणी येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनचे सिलिंडर रिकामे असल्याची बाब लक्षात आल्यानंतर अर्ध्या रस्त्यातून रुग्णवाहिका परत दवाखान्यात आणण्यात आली. ३० जून रोजी हा प्रकार घडला.
बोरी येथील पूनम अशोक वाघमारे या महिलेला २९ जून रोजी रात्री १० वाजता प्रसुतीसाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. ३० जून रोजी या महिलेची प्रसुती झाली. मात्र जन्मलेल्या बाळाची प्रकृती गंभीर असल्याने बोरी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बाळास परभणी येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या सहाय्याने या बाळाला परभणी येथे आणले जात होते. ही रुग्णवाहिका अर्ध्या वाटेत आल्यानंतर रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलिंडर संपल्याची बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या प्रकारानंतर रुग्णवाहिका थेट माघारी फिरवत बोरी ग्रामीण रुग्णालयात आणली. ग्रामस्थांनी स्वत: रुग्णालयातील स्टोअर रुममधून ऑक्सिजन सिलिंडर रुग्णवाहिकेत टाकले आणि त्यानंतर या रुग्णवाहिकेचा परभणीच्या दिशेने प्रवास सुरु झाला.
बोरी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडरचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे ग्रामस्थांनी दवाखान्यात गर्दी केली होती. जि.प.तील राकाँचे गटनेते अजय चौधरी यांनी औषधी साठ्यांची तपासणी केली असता नुकतेच दोन ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली.