धक्कादायक ! औषधी फवारणीचे अज्ञान शेतकऱ्यांच्या मुळावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 09:30 PM2020-07-25T21:30:52+5:302020-07-25T21:33:44+5:30

फवारणीची तंत्रशुद्ध माहिती नसल्याने शेतकऱ्यांना संकटाला सामोरे जावे लागते

Shocking! Ignorance of drug spraying at the root of farmers death | धक्कादायक ! औषधी फवारणीचे अज्ञान शेतकऱ्यांच्या मुळावर

धक्कादायक ! औषधी फवारणीचे अज्ञान शेतकऱ्यांच्या मुळावर

Next
ठळक मुद्देएका महिला शेतकऱ्याचा मृत्यू माहितीच्या अभावामुळे शेतकरी असुरक्षित

- मारोती जुंबडे

परभणी : राज्य शासनाचे आदेश असतानाही जिल्ह्यात फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत कृषी विभागाकडून प्रभावी जनजागृती होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असुरक्षितता निर्माण झाली आहे़  अशातच सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील एका शेतकरी महिलेचा कीटकनाशक तोंडात गेल्याने २३ जुलै रोजी मृत्यू झाला आहे.
 

यवतमाळ जिल्ह्यात तीन वर्षापूर्वी फवारणी करतांना शेतकऱ्यांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरू झाले होते़ फवारणीची तंत्रशुद्ध माहिती नसल्याने शेतकऱ्यांना या संकटाला सामोरे जावे लागले़ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे  मृत्यूचे वाढते प्रमाण लक्षात घेवून राज्य शासनाने स्वतंत्र अद्यादेश काढून कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी गावागावात जावून फवारणी कशी करावी? फवारणी करतांना काय काळजी घ्यावी? याबाबत जनजागृती करण्याचे आदेश दिले होते़ मात्र तीन वर्षांपासून कृषी विभागाने हा आदेशच गांभिर्याने घेतला नाही़
 

परभणी जिल्ह्यात गतवर्षी जिंतूर तालुक्यातील कौसडी यासह अन्य एका शेतकऱ्याचा फवारणी करताना मृत्यू झाला होता़ त्यानंतर कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कौसडी येथे भेट देवून केवळ औपचारीकता पूर्ण केली; परंतु, त्यानंतर मात्र पहिले पाढे पंचावन्न नुसार आपले काम सुरू ठेवले़ या घटनेवरून या वर्षीतरी कृषी विभाग फवारणी संदर्भातल्या जनजागृतीला प्राधान्य देवून गावागावात जुलै महिन्यापर्यंत जनजागृती करून शेतकरी व शेत मजुरांना प्रशिक्षण देईल, अशी अपेक्षा होती़ मात्र उदासिन भूमिकेची चादर चढलेल्या कृषी विभागाला कोणतेही देणे घेणे नसल्याचे दिसून येत आहे़ यावर्षी १ लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस व अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी पूर्ण झाली आहे़ सर्वसाधारणपणे होत असलेल्या पावसावर ही पीके बहरली आहेत़ मागील पंधरा दिवसांपासून शेतकऱ्यांनी कीड व रोगराईपासून आपली पिके सुरक्षीत ठेवण्यासाठी वेगवेगळ्या कीटकनाशकांची फवारणीही सुरू केली आहे़ त्यातच सेलू तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील वेणूबाई मुरलीधर काळदाते (५०) ही शेतकरी महिला व तिचा मुलगा २३ जुलै रोजी कापूस पिकावर फवारणी करीत असताना, महिला शेतकऱ्याच्या तोंडात कीटकनाशक गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली़ त्यामुळे भविष्यातील धोका ओळखूण कृषी विभागाने तातडीने पावले उचलत जिल्ह्यातील ८४८ गावांमध्ये जावून फवारणी संदर्भात जनजागृती करून शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे़ ़


६५० गावांतील शेतकऱ्यांना देणार प्रशिक्षण
खरीप हंगामातील पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करतांना घ्यावयाच्या काळजीबाबत जिल्ह्यातील ६५० गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे़ तसेच फवारणी कशी करायची? कोणत्या औषधांची निवड करायची? कीटकनाशकांची मात्रा आदींबाबत शेतीशाळेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे़ आतापर्यंत बीज प्रक्रिया, अंकूर उगवण क्षमता, बी़बी़एफ़ यंत्रामार्फत पेरणी आदीबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून प्रशिक्षण देण्यात आले असल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली़  


किटकनाशकांच्या तपासणीकडे दुर्लक्ष
जिल्हा गुण नियंत्रक अधिकारी यांच्याकडून किटकनाशकांची नियमित तपासणी केली जात नाही. त्यांचा हा कामचुकारपणा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा ठरत आहे.


जिल्हा गुणनियंत्रक विभाग प्रभावहीन
४खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेतून कीटकनाशकांची खरेदीकरून फवारणी सुरू केली आहे;परंतु, अद्यापपर्यंत जिल्हा गुणनियंत्रक विभाकडून कोणत्याही दुकानाची तपासणी करण्यात आली नाही़ त्यामुळे येथील जिल्हा गुण नियंत्रक विभाग प्रभावहीन असल्याचे दिसून येत आहे़

परवानगी नसलेली किटकनाशके बाजारात
खरीप हंगामातील पिकांना कीड व रोगांपासून मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांक डून कीटकनाशकांची फवारणी केली जाते़ यासाठी किटकनाशक कसे हाताळायचे? यावर कृषी विभागाकडून शेतकऱ्यांची जनजागृती करण्यात येते; परंतु, तसे होतांना दिसून येत नाही़ विशेष म्हणजे ज्या किटकनाशकांना विक्री करण्यासाठी परवानगी नाही, ती किटकनाशके सुद्धा बाजारात सर्रासपणे विक्री केली जात आहेत़ कृषी विभाग मात्र बघ्याची भूमिका घेवून एक प्रकारे किटकनाशक विक्रीस सहमती देतो की, काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे़ विशेष म्हणजे किटकनाशकांची तपासणी करणारे अधिकारी व कर्मचारी बाजारपेठेत फिरतांनाही दिसून येत नाहीत़


फवारणी करतांना शेतकऱ्यांनी प्रमाणीत औषधीची निवड करावी. अचूक मात्रेत कीटकनाशकाचा वापर करावा, फवारणी करतांना तोंडावर रूमाल बांधावा किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या कीटचा वापर करून शेतकरी व शेत मजुरांनी स्वत:ची काळजी घ्यावी़
-संतोष आळसे,  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी

Web Title: Shocking! Ignorance of drug spraying at the root of farmers death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.