प्रॉपर्टी पुढे नाते फिके पडले, जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच केला खून
By ज्ञानेश्वर भाले | Published: April 30, 2024 02:07 PM2024-04-30T14:07:15+5:302024-04-30T15:38:23+5:30
सेलू तालुक्यातील मोरेगावात सोमवारी रात्रीची घटना
सेलू (जि. परभणी) : मोरेगावात सोमवारी रात्री आठ वाजेदरम्यान एका मंदिरात जेवणासाठी गेलेल्या एकास जमिनीच्या वादातून सख्या भावानेच धारदार शस्त्राने मारहाण करून त्याचा खून केल्याचा दुर्दैवी प्रकार घडला आहे. मधुकर मारोतराव मगर असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मधुकर मारोतराव मगर (रा. मोरेगाव, ता.सेलू) हे सोमवारी रात्री आठदरम्यान मोरेगावातील मोरेश्वरी मंदिरात जेवणाच्या कार्यक्रमासाठी गेले असता तेथे राजेभाऊ ऊर्फ अशोक मारोतराव मगर हेही होते. यावेळी जमिनीच्या वादातून मोठा भाऊ राजेभाऊ ऊर्फ अशोक याने लहान भाऊ मधुकर मगर याच्या गळ्यावर, डाव्या पायावर, तोंडावर, छातीचे डाव्या बाजूस मारुन त्याचा खून केला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी सुनिल ओव्हाळ, पो.नि. दिपक बोरसे, सपोनि सुनील चव्हाण, पोउपनि अशोक जटाळ, पोलीस हवालदार शिवदास सुर्यवंशी हे तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. याप्रकरणी मयताची पत्नी अलका मगर यांच्या फिर्यादीवरून आरोपी राजेभाऊ ऊर्फ अशोकविरूद्ध सेलू ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यास अटक करण्यात आली आहेत. तपासकामी पोउपनी अशोक जटाळ यांचेकडे देण्यात आले आहे.