दुकाने बंद, व्यवसाय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:13 AM2021-04-29T04:13:04+5:302021-04-29T04:13:04+5:30
परभणी : संचारबंदी काळात बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नावालाच पाळले जात आहेत. दुकानाचे शटर बंद करून मागच्या दाराने व्यवसाय ...
परभणी : संचारबंदी काळात बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश नावालाच पाळले जात आहेत. दुकानाचे शटर बंद करून मागच्या दाराने व्यवसाय केला जात आहे. ही स्थिती सध्या शहरात सर्वत्रच पाहायला मिळत आहे. याकडे महापालिका पथक आणि पोलिसांचेही दुर्लक्ष झाले आहे.
किराणा दुकानांसह भाजीपाला, फळविक्री यांना नव्या आदेशाप्रमाणे तीस तारखेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मात्र, गल्लीत बिनधास्त दुकाने सुरू ठेवून व्यवसाय केला जात आहे. मागील चार दिवसांपासून ज्याप्रमाणे भाजीपाला गल्लोगल्ली फिरून विक्री केला जात आहे तसेच किराणा व्यावसायिकही काहीवेळाकरिता का होईना दुकाने सुरू ठेवून ग्राहकांना पाहिजे ती वस्तू देत आहेत. काही दुकानदार दुकानाचे शटर बंद करून साहित्याचा पुरवठा करत आहेत.
बाजारपेठेप्रमाणे अंतर्गत वसाहतीत गस्त वाढवा
शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, क्रांती चौक, नानल पेठ यासह अपना कॉर्नर व अन्य बाजारपेठेत पोलिसांचे पथक दिवसभरात गस्त घालत आहे. याचप्रमाणे अन्य वसाहतींमध्ये पोलिसांनी गस्त घालून दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
महापालिका पथक गायब
महापालिकेचे पथक मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई केल्याचे दाखवते. परंतु, प्रत्यक्षात दुकाने उघडी ठेवून व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही. सध्या हे पथक गायब झाले आहे.