दिवसभर पावसाची भुरभुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:12 AM2021-07-22T04:12:59+5:302021-07-22T04:12:59+5:30

परभणी : जिल्ह्यात भीजपाऊस सुरू झाला असून, सर्वदूर होत असलेल्या या पावसामुळे शेतशिवारांत पाणी साचले आहे. हा पाऊस आता ...

A shower of rain throughout the day | दिवसभर पावसाची भुरभुर

दिवसभर पावसाची भुरभुर

Next

परभणी : जिल्ह्यात भीजपाऊस सुरू झाला असून, सर्वदूर होत असलेल्या या पावसामुळे शेतशिवारांत पाणी साचले आहे. हा पाऊस आता थांबला नाही तर खरीप पिकांना धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात अपेक्षित पावसापेक्षाही अधिक पाऊस होत आहे. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यानंतरही पाऊस थांबलेला नाही. दररोज पाऊस होत असल्याने शेतात पाणी साचले आहे. बुधवारी सकाळपासूनच जिल्हाभरात भीजपावसाला प्रारंभ झाला. सूर्यदर्शन झाले नसल्याने सकाळपासूनच पावसाळी वातावरण आणि त्यात रिमझिम पाऊस होत असल्याने शहरातील रस्ते चिखलमय झाले होत. प्रमुख रस्त्यांसह वसाहतींमधील अंतर्गत रस्तेही चिखलमय झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. वरून पाऊस आणि रस्त्यांवर चिखल यामुळे रस्ता पार करताना कसरत करावी लागली. परभणी, गंगाखेड, जिंतूर, पूर्णा या सर्वच तालुक्यांत दिवसभर पावसाची रिमझिम होती.

दरम्यान, बुधवारी झालेला पाऊस पिकांसाठी धोकादायक नसला तरी यापुढे पाऊस थांबला नाही तर पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे निम्म्या पिकांचे नुकसान झाले आहे. बचावलेली पिके जगविण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत. त्यातच पुन्हा पाऊस झाला आहे. सध्या शेतात पाणी साचले आहे. आता पिकांना उन्हाची आवश्यकता आहे. त्यामुळे हा पाऊस थांबला नाही तर सोयाबीन पिवळे पडण्याची, तसेच कापूस उमळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाथरी तालुक्यातील ढालेगाव, मुद्‌गल हे बंधारे पाण्याने तुडुंब झाले असून, ढालेगाव बंधाऱ्याचे दोन दरवाजे उघडून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे गंगाखेड व परिसरात गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर्णा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे. नदीपात्राची पाणीपातळी दीड मीटर असल्याची माहिती पूर्णा पाटबंधारे विभागाने दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस

परभणी : ५०३

गंगाखेड : ४१९.५

पाथरी : ५१५.९

जिंतूर : ४४५

पूर्णा : ५१३.३

पालम : ४८१.३

सेलू : ४५६.५

सोनपेठ : ५२६.३

मानवत : ४७६

एकूण : ४७९.७

Web Title: A shower of rain throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.