मराठा आरक्षणासाठी एकाचवेळी ५३ गावांत उपोषण, सरकारची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 12:39 PM2023-09-08T12:39:00+5:302023-09-08T12:39:39+5:30
मराठा आरक्षणासाठी मानवत तालुक्यातील सकल मराठा समाजाची आक्रमक भूमिका
- सत्यशील धबडगे
मानवत : मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता तालुक्यातील ५३ गावात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरवात करण्यात आली. या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले असून आंदोलकांनी राज्यसरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात यावा व मराठा आरक्षण देण्यासाठी तात्काळ विशेष विधानसभा अधिवेशन बोलविण्यात यावे या मागणीसाठी ८ सप्टेंबर रोजी तालुक्यातील ५३ गावात सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच या वेळेत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या नुसार आज सकाळी आंदोलनाला सुरवात करण्यात आली.
गावोगावी ग्रामपंचायत कार्यालय, मंदीर आदी ठिकाणी समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. नागरजवळा, मानोली या गावी राज्यसरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. रत्नापुर येथे आंदोलकानी अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे.आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने तालुक्यातील शाळेत अघोषित सुट्टी असल्याचे चित्र निर्माण झाले. एकाच वेळी ५३ गावात आंदोलन केले जाणार असल्याने परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाचा कस लागणार आहे.