दिवाळीला बहिण माहेरी आली नाही; भाऊ भेटायला आल्याने रागात मेव्हण्याने पत्नीची केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 06:25 PM2020-11-20T18:25:28+5:302020-11-20T18:27:20+5:30
रागीट पतीने ऑटोरिक्षाचा अपघात करून पत्नीला ठार केले
गंगाखेड: दिवाळीसाठी बहीण माहेरी आली नसल्याने भाऊ तिला भेटण्यासाठी घरी आला. याचा राग मनात धरून पतीने भरधाव वेगातील ऑटोरिक्षाचा अपघातकरून पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी ( दि. १९ ) रात्री ७:३० वाजेच्या सुमारास कोद्री शिवारातील माळरानावर घडली. याप्रकरणी मृत विवाहितेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील डोंगरपिंपळा येथील सिद्धेश्वर तिडके यांची मोठी बहिण कौशल्याचे लग्न सात वर्षापूर्वी उंडेगाव येथील परमेश्वर मंचकराव कातकडे याच्या सोबत झाले होते. यावर्षी कौशल्या परमेश्वर कातकडे ( ३० ) या माहेरी गेल्या नाही. यामुळे तिला भेटण्यासाठी सिद्धेश्वर गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उंडेगावला आले. परमेश्वरचा रागीट स्वभाव असल्याने सिद्धेश्वर केवळ चहा घेऊन अर्ध्या तासात परत गेला. याची माहिती कळल्यानंतर रात्री ७:३० वाजेता परमेश्वरने सिद्धेश्वरला फोन करून,' तू माझ्या घरी कशासाठी आला होता' असे विचारात शिवीगाळ केली. यानंतर कौशल्याला, 'तुझ्या भावाला बोलावून घे नाहीतर तुला खपवून टाकीन' अशी धमकी दिली. कौशल्याने घाबरत फोनवरच भावाला लगेच येण्याचे सांगितले. यामुळे सिद्धेश्वर आई -वडीलांसह उंडेगावकडे निघाला.
दरम्यान, परमेश्वरने कौशल्याला ऑटोरिक्षात ( एम एच २२ एच २१०४ ) बसवून भरधाव वेगात नेल्याची माहिती सिद्धेश्वरला समजली. त्याने तत्काळ परमेश्वरला मोबाईलवर फोन केला. तेव्हा त्याने कौशल्या मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी सिद्धेश्वर याच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पुढील तपास पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेश राठोड हे करीत आहेत.