परभणीत प्लॅस्टिकचा सहा क्विंटल साठा जप्त; महापालिकेची धडक कारवाई
By राजन मगरुळकर | Updated: June 20, 2023 14:20 IST2023-06-20T14:18:59+5:302023-06-20T14:20:28+5:30
या ठिकाणी जवळपास अडीचशेहुन अधिक पोते प्लास्टिकचा वापर असलेले साहित्य जप्त करण्यात आले.

परभणीत प्लॅस्टिकचा सहा क्विंटल साठा जप्त; महापालिकेची धडक कारवाई
परभणी : प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक साहित्याचा वापर करून त्याचा साठा केल्याप्रकरणी मनपाच्या पथकाने शहरातील गंगाखेड रोड भागातील एका कारखान्यावर मंगळवारी सकाळी धडक कारवाई केली. यामध्ये अंदाजे सहा क्विंटल प्लास्टिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या साहित्याची अजूनही मोजदाद सुरू आहे.
मनपाच्या आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त डॉ.उत्कर्ष गुट्टे यांच्यासह स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, श्रीकांत कुऱ्हा यांच्यासह विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व पथकाने गंगाखेड रोड भागात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एका कारखान्यावर छापा टाकला. या ठिकाणी जवळपास अडीचशेहुन अधिक पोते प्लास्टिकचा वापर असलेले साहित्य जप्त करण्यात आले. तसेच ज्या प्लास्टिकचा वापर करण्यास बंदी आहे, असा साठा जप्त करून त्याची मोजदाद सुरू करण्यात आली आहे. बाबत संबंधित कारखाना मालक यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी कारवाई मनपाने केले आहे.