झोपडपट्टीतील रहिवासी प्रशासनाच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:04+5:302021-08-19T04:23:04+5:30
परभणी : झोपडपट्टीतील घरे नियमित करुन त्यांना मालकी हक्क द्यावा, या मागणीसाठी येथील संत गाडगेबाबा नगर बचाव कृती समितीच्या ...
परभणी : झोपडपट्टीतील घरे नियमित करुन त्यांना मालकी हक्क द्यावा, या मागणीसाठी येथील संत गाडगेबाबा नगर बचाव कृती समितीच्या वतीने १८ ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
येथील संत गाडगेबाबा नगर झोपडपट्टीतील रहिवासीयांना परभणी शहर महानगरपालिकेने घरांचा मालकी हक्क देऊन घरे नियमित करुन द्यावीत, अशी मागणी मागील दोन वर्षांपासून केली जात आहे. स्लम ॲक्ट १९७१नुसार खासगी मालकीच्या जागेवरील झोपडपट्टी नियमित करण्याची कायदेशीर तरतूद असूनही प्रशासन याबाबत कोणतीही दखल घेत नाही. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांसमक्ष प्रशासनाकडे ही मागणी केल्यानंतरही मनपा प्रशासनाने साधे लेखी उत्तरही रहिवासीयांना दिलेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या भागातील नागरिकांनी मालकी हक्क देण्याच्या मागणीसाठी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. ॲड.माधुरी क्षीरसागर, गणपत गायकवाड, नगरसेवक सचिन देशमुख, चंदू शिंदे, उत्तम चव्हाण, कैलास कांबळे, प्रकाश गोरेकर, सर्जेराव सदर, ज्ञानदेव मस्के, अनिल भवरे आदींसह रहिवासी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.