परभणीत भाजीमार्केटमध्ये सोशल डिस्टन्सचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 11:13 PM2020-04-11T23:13:52+5:302020-04-11T23:14:38+5:30
शहरातील पाथरी रोडवरील भाजी व फ्रुट मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सच्या नियमांचा बोजवारा उडाल्याची बाब शनिवारी सकाळी पहावयास मिळाली. या संदर्भात सातत्याने ओरड होत असतानाही कारवाई होत नसल्याची स्थिती पहावयास मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील पाथरी रोडवरील भाजी व फ्रुट मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सच्या नियमांचा बोजवारा उडाल्याची बाब शनिवारी सकाळी पहावयास मिळाली. या संदर्भात सातत्याने ओरड होत असतानाही कारवाई होत नसल्याची स्थिती पहावयास मिळत आहे.
कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अत्यावश्यक सेवेअंतर्गत साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना या संदर्भातील नियमांची माहिती देऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम जसे प्रशासकीय यंत्रणेचे आहे, तसेच बेशिस्त नागरिकांना शिस्त लावण्याचे कर्तव्यही या यंत्रणेचे आहे. जनहितासाठी या अनुषंगाने वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेतली तरी चालेल; परंतु, असे होताना दिसून येत नाही. परभणी जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. त्यामुळे एकीकडे नागरिकांनी जबाबदारीने वागण्याची गरज असताना त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव करुन देण्याचे काम प्रशासकीय यंत्रणेची आहे. परभणी शहरातील काळीकमान भागातील भाजी बाजार केवळ गर्दी होत असल्याने व सोशल डिस्टन्सच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याच्या कारणावरुन बंद करण्यात आला असला तरी अन्य ठिकाणी मात्र अशी भूमिका घेतली जात नसल्याची बाब सातत्याने समोर येत आहे. शहरातील गांधी पार्क, कच्छी लाईन आदी भागातील स्थिती कायम असताना आता पाथरी रोडवरील भाजी व फ्रुटमार्केटमध्येही सोशल डिस्टन्सच्या नियमांचा तिलांजली देण्यात आली असल्याचे पहावयास मिळत आहे. या बाजारात येणारे अनेक व्यापारी तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधत नाहीत. बेजबाबदारपणे भाजीपाला व फळे विक्रीचे व्यवहार करतात. विशेष म्हणजे हे साहित्य खरेदी करण्यासाठी येणाºया अनेक नागरिकांकडेही मास्क किंवा रुमाल नसल्याची स्थिती शनिवारी सकाळी पहावयास मिळाली. विशेष म्हणजे या बाजारातील व्यक्तीच्या व्यवहारावरुन कोरोनाची त्यांना माहिती आहेच की नाही, असा सवालही पडला. दैनंदिन बाबी प्रमाणे येथील काही व्यापारी, नागरिक व्यवहार करीत होते. मोठी गर्दी या भागात पहावयास मिळाली. त्यामुळे सोशल डिस्टन्स काय असते, हेच येथील व्यक्तींना माहित नसावे, असेच दृश्य पहावयास मिळाले. या बाजाराला शिस्त लावण्याचे काम प्रशासनाचे असतानाच येथे अधिकारीही फिरकले नाहीत. त्यामुळे येथे नियमांची पायमल्ली होताना दिसून आली. कोरोनाला जिल्ह्यात प्रवेशबंदी करायची असेल तर या अनुषंगाने ठरवून देण्यात आलेल्या नियमांची कडक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
पर्याय न देताच बाजार केला बंद
४शहरातील काळीकमान परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला विक्री केला जातो. येथे नागरिकांची गर्दी होऊ लागली व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन होऊ लागले म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी येथील भाजीपाला बाजार बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारवाईही झाली; परंतु, या परिसरात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाºया नागरिकांना पर्याय मात्र देण्यात आला नाही. महानगरपालिकेने यासाठी पुढाकार घेऊन शहराच्या वेगवेगळ्या भागात सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करुन भाजीपाला विक्री केंद्र सुरु करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक होते; परंतु, महानगरपालिकेकडून असे कोणतेही नियोजन झालेले नाही. त्यामुळे भाजीपाल्यासाठी नागरिकांना दारावर येणाºया हातगाड्यांची वाट पाहण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. विशेष म्हणजे काही अति उत्साही नागरिकांनी शहरातील महत्वाचे रस्ते बंद केले आहेत. त्याकडेही प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे.
नेते, अधिकाºयांनाही नियमांचा विसर
४सर्वसामान्य नागरिकांकडून बाजारामध्ये सोशल डिटन्सच्या नियमांचे पालन केले जात नसताना वरिष्ठ अधिकारी व राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही या नियमांचा विसर पडत असल्याचे दिसून येत आहे. गरजू नागरिकांना सध्या साहित्य वाटप केले जात आहे. तसेच काही मदतीचे कार्यक्रमही सुरु आहेत. या कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्ती चेहºयावर मास्क किंवा रुमाल बांधत नाहीत. तसेच सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करतानाही सोशल डिस्टन्सचे भान संबंधितांना दिसत नाही. विशेष म्हणजे या संदर्भातील छायाचित्र सोशल मीडियावर बिनदिक्कतपणे पोस्ट केली जात आहेत. त्यामुळे अधिकारी व नेतेमंडळीच नियमांचे पालन करीत नसतील तर जनतेने अपेक्षा कोणाकडून ठेवावी, असा सवाल उपस्थित होत आहे.