समाज माध्यमाचा गैरवापर भोवला ; ५७ जणांना नोटीसा: पोलीस अधीक्षकांकडून संबंधितांना तंबी
By राजन मगरुळकर | Updated: March 23, 2025 16:00 IST2025-03-23T16:00:14+5:302025-03-23T16:00:39+5:30
२१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.

समाज माध्यमाचा गैरवापर भोवला ; ५७ जणांना नोटीसा: पोलीस अधीक्षकांकडून संबंधितांना तंबी
राजन मंगरुळकर, परभणी : विविध धार्मिक, राजकीय मुद्द्यांवरून समाज माध्यमावर केलेल्या वादग्रस्त पोस्ट, कमेंट करणाऱ्या संबंधितांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून पोलीस अधीक्षकांनी तंबी दिली. त्याशिवाय समाज माध्यमाचा गैरवापर करणाऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले. यात २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ जणांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात सायबर पोलीस ठाण्यासह सर्व पोलीस ठाण्यामध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना केली आहे. त्यानुसार सर्व अंमलदार आणि पोलीस ठाणे स्तरावर वादग्रस्त पोस्ट करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी विविध टूल्स आणि हँशटँगचा वापर केला जात आहे. यात धार्मिक व राजकीय मुद्द्यावरून वादग्रस्त पोस्टवर पोलीस बारकाईने लक्ष ठेवून आहेत. प्रोफाइलची माहिती मिळवून संबंधित पोस्ट डिलीट करण्यासाठी प्रक्रिया पोलीसच पार पाडत आहेत. अशा गंभीर प्रकरणात वादग्रस्त पोस्ट, कमेंट करणाऱ्यावर चार गुन्हे दाखल झाले आहेत. २१ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई तर ५७ जणांना नोटीस देण्यात आल्या आहेत. यामध्ये बीएनएस २९९ अंतर्गत कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा दूष्ट उद्देशाने अपमान केल्याचे आढळल्यास तीन वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. बीएनएस ३५२ अंतर्गत कोणत्याही व्यक्तीचा जाणीवपूर्वक अपमान करून चिथावणी देणे, ज्यातून सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असेल अशा प्रकरणात दोन वर्षापर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.
या क्रमांकावर साधा संपर्क...
समाज माध्यमावर कुठलेही पेज, वैयक्तिक खात्यावर वादग्रस्त आक्षेपार्ह पोस्ट, कमेंट आढळून आल्यास ७७४५८५२२२२ या पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हाट्सअपवर लिंक, स्क्रीनशॉट पाठवावे. इतरत्र कुठेही सदर पोस्ट शेअर करू नये, ती लाईक करू नये अथवा त्यावर कसलीही कमेंट करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी नागरिकांना केले आहे.