सौरऊर्जेवरील पाणी पुरवठा योजना ठरल्या कुचकामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 01:38 PM2018-05-16T13:38:46+5:302018-05-16T13:38:46+5:30
दीड वर्षांपूर्वी तालुक्यातील वडी आणि झरी येथे सौरऊर्जावर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेतर्फे कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या नळ योजनेतून एकही दिवस टाकीतून नळाला पाणी आले नाही. यामुळे या दोन्ही गावच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत.
पाथरी (परभणी ) : दीड वर्षांपूर्वी तालुक्यातील वडी आणि झरी येथे सौरऊर्जावर आधारित दुहेरी पंप नळपाणी पुरवठा योजना जिल्हा परिषदेतर्फे कार्यान्वित करण्यात आली. मात्र, या नळ योजनेतून एकही दिवस टाकीतून नळाला पाणी आले नाही. यामुळे या दोन्ही गावच्या योजना कुचकामी ठरल्या आहेत.
ग्रामीण भागातील वाढते भारनियमन आणि विजेची अनियमितता लक्षयत घेऊन राज्य शासनाने सौर ऊर्जा वर आधारित दुहेरी पंप नळ पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली. ज्या वेळी वीज उपलब्ध आहे त्या वेळी विजेवर हातपंप सुरू ठेवायचा, वीज नसेल त्या वेळी सौर ऊर्जा वर पंप चालायचा अशी ही योजना आहे. तालुक्यातील हदगाव, वडी आणि झरी या तीन गावात पाणी पुरवठा व स्वछता विभाग, भुजल सर्वेक्षण विभागाच्यावतीने सौरऊर्जावर आधारित दुहेरी नळ पाणी पुरवठा योजना सुरु झाली. गावातील हातपंपावर वीज मोटार बसवून सौर ऊर्जा वर पाणी पुरवठा करण्यासाठी प्रत्येक गावच्या योजने साठी ५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. अंबाजोगाई येथील एका कंपनीने या योजनेचे काम देण्यात आले.
वडी येथील सौर ऊर्जा वरील ही योजना गावच्या मंदिर परिसरात असलेल्या जुन्या हातपंपावर विधुत मोटार बसवून सुरू करण्यात आली. त्यासाठी सौर ऊर्जा प्लेट बसवण्यात आल्या. याबरोबर स्वतंत्र पाण्याची टाकी, त्यास दोन नळ बसविण्यात आले. योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक झाले आणि त्यानंतर योजना कायम बंद पडली. तर झरी येथे तर प्रात्यक्षिक न करणाच योजना कार्यान्वित करण्यात आली. योजनेवर केलेल्या खर्च वाया गेला आहे,
प्रात्यक्षिक झाले नाही
वडी गावात सौर ऊर्जा आधारित नळ योजना साठी साहित्य बसविण्यात आले. मात्र, त्याची टेस्टिंग झालीच नाही. त्यामुळे नळाला पाणी आले नाही. तक्रार करून ही योजना सुरू होत नाही.
- चंदाताई शिवाजी कुटे, सरपंच, वडी
ऑनलाइन तक्रार केली
या योजनेतून ग्रामस्थांना पाण्याचा थेंब मिळाला नाही, मोटार बंद आहे, सौरऊर्जा ची प्लेट खराब आहे, अशी ऑनलाइन तक्रार केली, संबंधित विभागाने या कडे लक्ष दिले नाही त्या मुळे योजना बंद पडली आहे
- चंद्रहास सत्वधर, उपसरपंच झरी
हदगाव ची योजना मात्र सुरू
हदगाव बु येथे मात्र ही योजना कार्यान्वित झाल्यापासून सुरू आहे, उन्हाळ्यात ही योजना गावाला पाणी पुरवठा करत आहे.