सूर्यवंशी कुटुंबाने नाकारली शासकीय मदत; न्याय मिळेपर्यंत धनादेश स्वीकारण्यास नकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:28 IST2025-01-10T19:27:50+5:302025-01-10T19:28:55+5:30
जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शासनाची ही मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

सूर्यवंशी कुटुंबाने नाकारली शासकीय मदत; न्याय मिळेपर्यंत धनादेश स्वीकारण्यास नकार
परभणी : परभणीतील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला जाहीर केलेल्या दहा लाखांच्या शासकीय मदतीचा धनादेश जिल्हा प्रशासनातील महसूल विभागाच्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी सूर्यवंशी कुटुंबाला देण्यासाठी त्यांच्या घरी भेट घेतली. हा मदतीचा धनादेश न्याय मिळेपर्यंत स्वीकारणार नसल्याची भूमिका मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाने घेतली आहे. त्यामुळे त्यांनी हा धनादेश नाकारला आहे.
परभणी शहरातील संविधान अवमानाच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना १५ डिसेंबरला झाली होती. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मदतीचा धनादेश जिल्हा प्रशासनामार्फत बुधवारी महसूल विभागातील तलाठी काळे व अन्य कर्मचाऱ्यांनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील आई आणि भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांची भेट घेऊन सुपूर्द करण्यासाठी आले होते. यावेळी प्रेमनाथ सूर्यवंशी व त्यांची आई आणि कुटुंबाने या मदतीचा धनादेश स्वीकारण्यास नकार दर्शविला. जोपर्यंत कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत शासनाची ही मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.
अद्याप एफआयआरची नोंदसुद्धा झालेली नाही
जोपर्यंत माझ्या भावाच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, त्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत ही मदत स्वीकारणार नाही. मुख्यमंत्र्यांनी पाठविलेल्या या मदतीबद्दल आभारी आहोत. या प्रकरणात अजून एफआयआरची नोंदसुद्धा झालेली नाही. ही नोंद लवकर व्हावी आणि कुटुंबाला न्याय मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे.
- प्रेमनाथ सूर्यवंशी, परभणी