सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: शासनाचा प्रतिनिधी दुसऱ्यांदा आईकडे १० लाखांचा चेक घेऊन गेला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 17:20 IST2025-01-17T17:19:58+5:302025-01-17T17:20:31+5:30
राज्यभर या प्रकरणावरून गदारोळ झाला असून सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे.

सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण: शासनाचा प्रतिनिधी दुसऱ्यांदा आईकडे १० लाखांचा चेक घेऊन गेला, पण...
Somnath Suryavanchi Death: परभणी शहरातील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याची घटना १५ डिसेंबरला झाली होती. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली १० लाखांची मदत मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने दुसऱ्यांदा नाकारली आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याचं सूर्यवंशी कुटुंबाने स्पष्ट केलं आहे.
परभणी शहरात ११ डिसेंबर रोजी झालेल्या आंदोलन प्रकरणात नवा मोंढा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी (३६) यांना ताब्यात घेतले होते. त्यांना दोन दिवस पोलिस कोठडी आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती. १५ डिसेंबर रोजी सकाळी न्यायालयीन कोठडीत सोमनाथ याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानंतर राज्यभर या प्रकरणावरून गदारोळ झाला असून सूर्यवंशी यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला जाहीर केलेल्या १० लाखांच्या शासकीय मदतीचा धनादेश जिल्हा प्रशासनातील कर्मचारी देण्यास आज दुसऱ्यांदा त्यांच्या घरी गेले होते. मात्र न्याय मिळेपर्यंत धनादेश स्वीकारणार नसल्याचं कुटुंबाने सांगितलं आहे.
परभणी ते मुंबई लाँग मार्च
न्यायालय कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात दोषी असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी आण सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबीयांना वाढीव मदत देण्यात यावी, यासह अनेक मागण्या घेऊन आज परभणी ते मुंबई असा लाँग मार्च आंबेडकरी अनुयायांकडून काढण्यात येत आहे.