कोरोना परतू लागताच पुण्या, मुंबईकडे ओढा वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:13 AM2021-07-21T04:13:55+5:302021-07-21T04:13:55+5:30
परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाला तसा जिल्ह्यातील कामगार आता पुन्हा कामाच्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे पुण्या- मुंबईकडे जाणाऱ्या ...
परभणी : कोरोनाचा संसर्ग कमी झाला तसा जिल्ह्यातील कामगार आता पुन्हा कामाच्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे पुण्या- मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना चांगलीच गर्दी होत आहे.कोरोनाच्या संसर्ग काळात अडकून पडू नये, या धास्तीने पुणे, मुंबई, औरंगाबाद या मोठ्या शहरात रोजगारासाठी गेलेले अनेक कामगार जिल्ह्यात परतले. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही हे चित्र दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही हे कामगार जिल्ह्यात दाखल झाले होते; मात्र आता कोरोना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे कामगार पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी जात आहेत. मागील महिनाभरापासून येथील बसस्थानकावर पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना गर्दी होत असून, रेल्वे गाड्यांचीही हीच स्थिती आहे.
२ हजार कामगार आले होते जिल्ह्यात
परजिल्ह्यातून कामाच्या शोधार्थ गेेलेले २ हजार कामगार दुसऱ्या लाटेपूर्वी जिल्ह्यात दाखल झाले होते, अशी नोंद येथील आरोग्य विभागाने घेतली आहे. या कामगारांपैकी बहुतांश कामगार परतीच्या वाटेवर आहेत.
परदेशात जाण्याचीही तयारी...
शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने परदेशात स्थलांतरित झालेले जिल्ह्यातील युवक आता पुन्हा परदेशात जाण्याची तयारी करीत आहेत. या युवकांसाठी मनपाने स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू केले आहे. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थी, युवकांची संख्या ८ ते १० असल्याची माहिती मिळाली.