५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:32 AM2021-02-21T04:32:53+5:302021-02-21T04:32:53+5:30
परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, ...
परभणी : यावर्षीच्या रबी हंगामात उपलब्ध पाण्याचा उपयोग घेत शेतकऱ्यांनी २ लाख ५९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर ज्वारी, हरभरा, गहू, जवस, करडई आदी पिकांची पेरणी केली. ही पिके सध्या बहरलेल्या अवस्थेत आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टरपैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांनी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, मूग, सोयाबीन व उडीद, तूर आदी पिकांची लागवड केली. बहरलेल्या अवस्थेत असतानाच सप्टेंबर व ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेले हे पीक जमीनदोस्त झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील नुकसानीचे दु:ख पचवत रबी हंगामात शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा विचार करून मोठ्या प्रमाणात ज्वारी, हरभरा, गहू, मका, करडई, जवस, ऊस आदी पिकांची लागवड केली. सध्या या पिकांना शेतकऱ्यांकडून ३ ते ४ पाणी पाळ्या देण्यात आल्या आहेत. निम्न दुधना प्रकल्प व जायकवाडी धरणाच्या पाण्यावर ही पिके सध्या बहरली आहेत. मात्र, गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे रबी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, ऊस आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी यावर्षीच्या रबी हंगामात पेरणी केलेल्या ९८ हजार ७७३ हेक्टर पैकी ५० हजार हेक्टरवरील ज्वारी पीक आडवे झाले आहे. त्यामुळे बहरलेल्या ज्वारी पिकातून यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या बळीराजाला खरीपापाठोपाठ रबी हंगामातही नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.
...अशी झाली पेरणी
२०२०-२१ या रबी हंगामात ९८ हजार ७७३ हेक्टरवर ज्वारी, ३९ हजार १४ हेक्टरवर गहू, १ लाख १८ हजार ७१६ हेक्टरवर हरभरा, १ हजार १९७ हेक्टरवर करडई आदी पिकांची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासाठी हजारो रुपयांचा खर्चही या पिकांवर केला आहे. विशेष म्हणजे यावर्षीच्या रबी हंगामात सर्वाधिक १८६ टक्के हरभऱ्याची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, या अवकाळी पावसामुळे बहुतांश ठिकाणी काढून ठेवलेले हरभरा पीक व काढणीस आलेल्या गव्हाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रशासनाने नुकसानीग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांमधून होत आहे.