गोदावरी पट्ट्यात १७ हजार हेक्टरवर ऊस लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:55 PM2018-05-15T18:55:31+5:302018-05-15T18:55:31+5:30
पाथरी तालुक्याला जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून व गोदावरी नदीपात्रातून बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे.
- विठ्ठल भिसे
पाथरी (परभणी ) : पाथरी तालुक्याला जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून व गोदावरी नदीपात्रातून बंधाऱ्यामध्ये मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने सिंचन क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. काही वर्षानंतर पहिल्यांदाच १६ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे.
पाथरी तालुक्यात तीन ते चार वर्षे दुष्काळी स्थिती होती. अत्यंत कमी पाऊस होत असल्याने बागायतीचे क्षेत्र कमी झाले होते. काही वर्षापूर्वी पाथरी तालुक्यातील गोदावरीचा भाग उसाचा पट्टा म्हणून ओळखला जात होता. दोन खाजगी साखर कारखाने असूनही पाण्याची सुविधा अपुरी पडत असल्याने उसाचे क्षेत्रही घटले होते. यावर्षी मात्र परिस्थिती बदलली आहे. पाथरी तालुक्यातून जाणाऱ्या जायकवाडीच्या डाव्या कालव्याला पाणी सोडण्यात येत आहे. तसेच गोदावरी नदीपात्रावरील बंधाऱ्यामध्येही मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे. तालुक्यात पाणी मुबलक उपलब्ध झाल्याने शेतकरीही आता कोरडवाहू पिके सोडून बागायतीची पिके घेत आहेत.
नगदी पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. अनेक वर्षानंतर पाथरी तालुक्यातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळले आहेत. पाथरी येथील रेणुका शुगर व लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स या दोन खाजगी कारखानाक्षेत्रात उसाचे क्षेत्र वाढले आहे. पाथरी कारखाना कार्यक्षेत्रात ७ हजार ८४० हेक्टर तर लिंबा कारखाना कार्र्यक्षेत्रात ८ हजार ९७६ हेक्टर, अशा एकूण १६ हजार ८१६ हेक्टरवर ऊस लागवड झाल्याची नोंदणी झाली आहे. गतवर्षी पाथरीच्या रेणुका शुगर्सने १ लाख ६० हजार मे. टन तर लिंबा येथील योगेश्वरी शुगर्सने २ लाख मे.टन उसाचे गाळप केले होते.
पूर्ण क्षमतेने गाळप होण्याची आवश्यकता
पाथरी तालुक्यात यावर्षी प्रथमच १६ हजार ८१६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. कारखान्याच्या गाळप क्षमतेपेक्षा ३५ टक्के अधिक ही लागवड आहे. परभणी जिल्ह्यात पाथरी येथील रेणुका शुगर्स, लिंबा येथील योगेश्वरी शुगर्स, गंगाखेड, पूर्णा, त्रिधारा असे पाच कारखाने आहेत. गतवर्षी जिल्हाबाहेरील ७ ते ८ कारखाने शेतकऱ्यांची मनधरणी करीत ऊस घेऊन जात होते. यावर्षी सगळीकडेच उसाचे क्षेत्र वाढले आहे. बीड जिल्ह्यातही अधिक उसाची लागवड झाली आहे. त्यामुळे तेथील कारखाने ऊस गाळपासाठी नेतील, याची शाश्वती उरली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कारखाने वेळेत पूर्ण क्षमतेने गाळप करू शकल्यास अतिरिक्त उसाचा प्रश्नही मिटण्यास मदत होणार आहे.