सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांवर; शेतकरी म्हणतात, आता काय करू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:19 AM2021-09-27T04:19:42+5:302021-09-27T04:19:42+5:30
जिल्ह्यात पेरणी झालेल्या २ लाख ३० हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांनी भाव वाढीमुळे अनेक अपेक्षा बाळगत पिकांवर भला मोठा खर्च केला. ...
जिल्ह्यात पेरणी झालेल्या २ लाख ३० हजार हेक्टरवरील शेतकऱ्यांनी भाव वाढीमुळे अनेक अपेक्षा बाळगत पिकांवर भला मोठा खर्च केला. दरवर्षीपेक्षा या वर्षी परभणी जिल्ह्यातील सोयाबीनच्या क्षेत्रातही शेतकऱ्यांनी मोठी वाढ केली आहे. जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांत समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक सध्या बहरात आहे. तर काही ठिकाणी पिकाची काढणी झाली असून, ते बाजारात विक्रीसाठी येत आहे. ११ हजार रुपयांचा भाव मिळेल, या अपेक्षेने बाजारात आलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा पुरता भ्रमनिरास झाला आहे.
खोऱ्याने पैसा ओतला, आता काय करू?
भाववाढीच्या अपेक्षेने गतवर्षीपेक्षा यावर्षी पीक निरोगी राहावे, यासाठी मोठा खर्च केला. मात्र, बाजारात सोयाबीन येण्याआधीच भाव गडगडल्याने खोऱ्याने पैसा आता काय करू म्हणण्याची वेळ माझ्यावर आली आहे. - लक्ष्मण वैद्य, शेतकरी
दरवर्षी शेतकऱ्यांकडे सोयाबीन आल्यानंतर व्यापाऱ्यांकडून मुद्दामहून भाव पाडले जातात. शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले की भाववाढ केली जाते. त्यामुळे ही प्रक्रिया बरखास्त करून शेतकऱ्यांना भाव ठरविण्याचा अधिकार द्यावेत, तरच शेतकरी सुजलाम सुफलाम होईल. - माणिक कदम, शेतकरी
विकण्याची घाई करू नका
सध्या सोयाबीन काढणीला आले आहे. मात्र, भावातील घसरण झाल्याने अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे सध्या सोयाबीन विक्री करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
सोयाबीनचे दर (प्रतिक्विंटल)
जानेवारी २०२० ४००० रुपये
जून २०२० ३५०० रुपये
ऑक्टोबर २०२० ४००० रुपये
जानेवारी २०२१ ५००० रुपये
जून २०२१ ११००० रुपये
सप्टेंबर २०२१ ५००० रुपये
सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये)
२०१८ २ लाख १० हजार
२०१९ २ लाख २४ हजार
२०२० २ लाख ३० हजार
२०२१ २ लाख ३० हजार