भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:23 AM2021-09-09T04:23:23+5:302021-09-09T04:23:23+5:30
परभणी : मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वर्षी २ लाख ४२ हजार ...
परभणी : मागील काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वर्षी २ लाख ४२ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा केला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून या पिकावर मिलीबग या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने त्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केल्याचे सध्या तरी जिल्ह्यात दिसून येत आहे.
जिल्ह्यात दरवर्षी ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते. या वर्षी १०० टक्के हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, आदी पिकांची पेरणी केली. जून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसामुळे ही पिके चांगलीच बहरली.
नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा जिल्ह्यात सर्वाधिक २ लाख ४२ हेक्टरवर पेरा झाला आहे. त्यातच हे पीक उत्तम स्थितीत असल्याने शेतकरी आनंदित आहेत. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात होत असलेली अतिवृष्टी व मिलीबग किडीच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मिलीबग कीड सोयाबीनचे खोड, पानाच्या देठाजवळ पुंजक्यात राहते. ही कीड झाडातील रसाचे शोषण करते. कीड चिकट द्राव सोडते, त्यामुळे पाने काळपट होतात. जास्त प्रादुर्भाव झाला तर पाने व फांद्या वाळून जातात. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टी व मिलीबग या किडींच्या प्रादुर्भावामुळे हातून जातेय की काय अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
नियंत्रणाचे उपाय
जैविक कीडनाशकाचा वापर करताना व्हर्टिसिलियम लेकॅनी ४० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेथे किडीचा प्रादुर्भाव आहे, तेथेच याची फवारणी करावी. फवारणीच्या वेळी हवेत आर्द्रता असायला हवी. रासायनिक कीडनाशकांचा वापर करताना क्लोरपायरिफॉस (२० टक्के) ३० मि.लि. किंवा बुप्रोफ्रेझीन २० मि.लि. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही फवारणी प्रादुर्भावित पाने, झाडाचे खोड तसेच जमिनीवरदेखील करावी.