शिष्टमंडळाच्या भेटीनंतर एसपींनी काढले तडकाफडकी आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:48 AM2020-12-04T04:48:10+5:302020-12-04T04:48:10+5:30
पाथरी: येथील पोलीस उपनिरीक्षकाच्या भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असून लाच घेतल्याशिवाय कामे होत नसल्याची तक्रार आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या ...
पाथरी: येथील पोलीस उपनिरीक्षकाच्या भ्रष्ट कारभारामुळे सर्वसामान्यांना त्रास होत असून लाच घेतल्याशिवाय कामे होत नसल्याची तक्रार आ.बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे केल्यानंतर या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक टोपजी कोरके व अन्य एका कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश मीना यांनी काढले आहेत. त्यांच्या या कारवाईचे स्वागत होत आहे.
येथील पोलीस ठाण्याजी टोपाजी कोरके हे दोन वर्षांपासून उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधीही नाराज होते. कोणत्याही प्रकरणात तडजोडीची भाषा केली जाते. आरोपींना मदत करण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. मात्र या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहाेचत नसल्याने कोरके यांचे मनोधैर्य वाढत गेले. त्यातच माजी नगरसेवक लालू खान यांच्या विरोधात दाखल झालेल्या एका प्रकरणात आरोपीच्या जामिनासाठी लाच घेतल्यानंतर पदाधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. तर दुसऱ्या एका प्रकरणात पोलीस शिपाई रमेश मुंडे यांनी लाच न दिल्याने आरोपीस पोलीस कोठडी ठेवले होते. त्यामुळे या प्रकरणात अधीक्षकांकडे तक्रार करण्याची तयारी सुरु झाली. २ डिसेंबर रोजी आ.बाबाजानी दुर्राणी, न.प.चे गटनेते जुनैद खान, माजी नगरसेवक लालू खान यांनी पोलीस उपनिरीक्षक कोरके आणि मुंडे यांच्या संदर्भातील वस्तुस्थिती पोलीस अधीक्षक मीना यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी चंदन चोरीच्या प्रकरणातील कारवाईचाही लेखाजोखा मांडण्यात आला. या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्याने पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी उपनिरीक्षक टोपाजी कोरके आणि कर्मचारी रमेश मुंडे या दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले आहेत.