भरधाव वेगातील हायवाची सात वाहनांना धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:52 AM2021-01-08T04:52:54+5:302021-01-08T04:52:54+5:30
गंगाखेड शहरातील परळी रस्त्यावर असलेल्या जिनिंगवर कापूस विक्रीसाठी आलेली कापसाची वाहने जिनिंगबाहेर रांगेत उभी होती. ५ जानेवारी रोजी रात्री ...
गंगाखेड शहरातील परळी रस्त्यावर असलेल्या जिनिंगवर कापूस विक्रीसाठी आलेली कापसाची वाहने जिनिंगबाहेर रांगेत उभी होती. ५ जानेवारी रोजी रात्री १०:१५ वाजेच्या सुमारास गंगाखेड येथून परळीकडे जाणाऱ्या भरधाव हायवा टिप्पर (क्र.एमएच ४६ बीबी ७६५४) च्या चालकाने हयगय व निष्काळजीपणे चालवून सात वाहनांना धडक दिली. यामध्ये तुकाराम संतराम बाजगीर रा. लेंडेगाव (मोझमाबाद) ता. पालम यांच्या उभ्या कापसाच्या आयशर टेम्पो क्रमांक एमएच १४ एझेड २१८५ ला जोराची धडक दिल्याने हा टेम्पो रस्त्याखाली जाऊन पलटी झाला. तसेच नारायण विठ्ठलराव सूर्यवंशी यांच्या टेम्पो क्रमांक एमएच ०४ बीयु २४०५ सह एमएच २२ एए ३७१६, एमएच २१ - ८६२६, एमएच १४ एएफ ७२१३, एमएच १२ एए ३७३६, एमएच २३ - २४४९ या वाहनांना धडक देऊन या वाहनांचे मोठे नुकसान केले. अपघाताची घटना घडली तेव्हा कापूस विक्रीसाठी आलेले वाहनचालक जिनिंगबाहेर कापसाच्या वाहनांची रांग लावून जेवायला गेलेले असल्याने जीवितहानी टळली. हायवाचालक मात्र स्वतःच जखमी झाल्याची फिर्याद तुकाराम संतराम बाजगीर रा. लेंडेगाव (मोझमाबाद) ता. पालम यांनी दिल्यावरून हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार रतन सावंत, पो. ना. दत्तराव पडोळे, सुनील लोखंडे, विष्णू वाघ हे करीत आहेत.