परभणीत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बाजारपेठ कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 07:39 PM2020-01-29T19:39:23+5:302020-01-29T19:40:22+5:30
एसीसी आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते.
परभणी : एसीसी आणि एनआरसी कायदा रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी बहुजन मुक्ती मोर्चाने पुकारलेल्या भारत बंदलापरभणी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बाजारपेठ दुपारी दोन वाजेपर्यंत कडकडीत बंद होती.
एसीसी आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात बुधवारी भारत बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागातील दुकाने सकाळपासूनच बंद होती. दुपारी दोन वाजेपर्यंत बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पहावयास मिळाला. येथील जनता मार्केट, शिवाजी चौक, सुभाष रोड, स्टेशन रोड, बसस्थानक परिसर, जिंतूर रोड, डॉक्टर लेन, जिल्हा रुग्णालय परिसर या भागातील दुकाने बंद होती. शहरातील काही शाळाही बुधवारी बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे या बंदला परभणी शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पाथरी तालुक्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. गंगाखेड, सेलू, जिंतूर तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर सोनपेठ आणि पूर्णा तालुक्यात बंदचा कोणताही परिणाम झाला नाही. व्यवहार सुरळीत होते. दरम्यान बंद काळात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.