एसटीने पुन्हा धरली परराज्याची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:21 AM2021-09-24T04:21:40+5:302021-09-24T04:21:40+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. परिणामी एसटी महामंडळाची बससेवा ठप्प झाली होती. या काळात महामंडळाला मोठ्या ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. परिणामी एसटी महामंडळाची बससेवा ठप्प झाली होती. या काळात महामंडळाला मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागला. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला असून, व्यवहार पूर्ववत झाले आहेत. एसटी महामंडळानेही बहुतांश मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यांचे मिळून परभणी येथे महामंडळाचे विभागीय कार्यालय कार्यरत आहे. या विभागाअंतर्गत परराज्यात दोन बसेस चालविल्या जात असून या बस गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसादही मिळत आहे. बससेवा पूर्ववत केल्याने महामंडळाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.
हैदराबाद गाड्या फुल्ल
परभणी विभागातील परभणी आणि हिंगोली या दोन आगारातून परराज्यातील हैदराबादसाठी दोन बससेवा चालविल्या जात आहेत. दररोज साधारणत: ७० ते ७५ भारमान या गाड्यांना मिळते. त्यामुळे परराज्याच्या बससेवेलाही आता प्रतिसाद मिळू लागला आहे.
८५ टक्के वाहक, चालकांचे लसीकरण पूर्ण
परभणी विभागाअंतर्गत येणाऱ्या सातही आगारात एकूण १ हजार ७०० वाहक आणि चालक कार्यरत आहेत. परराज्यात वाहने नेण्यासाठी चालक आणि वाहकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. एसटी महामंडळाच्या परभणी विभागाने वाहक चालकांना लसीकरण करणे बंधनकारक केले असून, ८५ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी
परराज्यातील बससेवेबरोबरच जिल्हांतर्गत आणि राज्यांतर्गत बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. परभणी शहरासह सर्वच आगारातील बस स्थानकांवर दिवसभर प्रवाशांची मोठी गर्दी पाहावयास मिळते. तसेच बस गाड्याही फुल्ल होऊन धावत आहेत.
परराज्यात जाणाऱ्या बसेस...
परभणी - हैदराबाद
हिंगोली - हैदराबाद