ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी गाड्या कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:22 AM2021-09-04T04:22:24+5:302021-09-04T04:22:24+5:30
परभणी विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील चार आगारांचा समावेश आहे. या चार आगारांमधून दररोज हजारहून अधिक बसफेऱ्या करण्यात येतात. ...
परभणी विभागीय नियंत्रक कार्यालय अंतर्गत जिल्ह्यातील चार आगारांचा समावेश आहे. या चार आगारांमधून दररोज हजारहून अधिक बसफेऱ्या करण्यात येतात. यातून प्रवाशांची ने-आण करण्यात येते. मात्र मागील काही दिवसापासून नागरिकांच्या मनामधील कोरोनाची भीती अद्यापही दूर झालेली नाही. त्यामुळे एसटी बसेसला प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सोमवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले. परभणी आगारामधून कोविडपूर्वी ९ बसेस ग्रामीण भागात मुक्कामी थांबत होत्या. मात्र, सद्यस्थितीत केवळ ८ बसेस मुक्कामी थांबतात. जिंतूर आगारातील १७ बसेस कोविडपूर्वी मुक्कामी थांबत असत. परंतू, आता या केवळ ६ बसेस मुक्कामी सोडण्यात येत आहेत. गंगाखेडमध्ये केवळ १६ बसेस तर पाथरी आगारातून केवळ १२ बसेस मुक्कामी पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे चार आगारातून पूर्वी ७० बसेस या ग्रामीण भागात मुक्कामी थांबून प्रवाशांची गैरसोय दूर करत होत्या. मात्र सद्यस्थितीत ४२ बसेस ग्रामीण भागात मुक्कामी थांबून प्रवाशांची ने-आण करत आहेत. ही संख्या कमी असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होत असून नाईलाजास्तव अवैध प्रवासी वाहतुकीचा सहारा प्रवाशांना घ्यावा लागत आहे.
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या पुल्ल
परभणी तसेच अन्य आगारातून तालुक्याच्या ठिकाणी व राज्यातील विविध जिल्ह्यात शहरी भागात जाणाऱ्या बसेस सध्या फुल्ल होऊन धावत आहेत. मात्र, ग्रामीण भागात काही ठिकाणी बसेसला प्रतिसाद असतानाही त्या बसेस अद्याप बंद ठेवण्यात आल्या आहेत.
ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांना जागा मिळेना
परभणी तालुक्यातील धर्मापूरी, टाकळी, आर्वी, पिंगळी, जिंतूर तालुक्यातील बोरी, कौसडी, वालूर यासह पूर्णा तालुक्यातील ताडकळस व अन्य तालुक्यातील अनेक गावांमध्ये जाणाऱ्या ग्रामीण बसेसच्या दररोजच्या अनेक फेऱ्या होतात. यात सकाळी तसेच सायंकाळी या बसेसला प्रवाशांना जागा मिळत नाही.
मुक्कामी गाडी येत नसल्याने त्रास
जिंतूर आगारातून सध्या केवळ काही गावांनाच मुक्कामी बसेस सोडण्यात येतात. यामुळे अनेक गावांना जाण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. यामुळे विद्यार्थी तसेच ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. - अर्थव काळे, कौसडी.
ताडकळस तसेच फुलकळस या परिसरातील अनेक गावांना जोडणाऱ्या बसेस मुक्कामी सुरु करण्यात याव्यात. या भागातून परभणी येथे दररोज शेकडो शेतकरी तसेच विद्यार्थी विविध कामासाठी जात असतात. यामुळे रात्री गावाकडे परतताना लवकर सुटणारी बस पकडून जावे लागत आहे. - उत्तम घाडगे, उखळद.