बंद केलेली शाळा सुरु करण्यासाठी परभणी जिल्हा परिषदेच्या दालनात विद्यार्थ्यांचा वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 03:24 PM2018-12-20T15:24:14+5:302018-12-20T15:25:04+5:30
पांढरमाती तांडा येथील जि.प. प्राथमिक शाळा बंद करण्यात आली आहे
परभणी : बंद केलेली शाळा सुरु करावी, या मागणीसाठी गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड तालुक्यातील पांढरीमाती तांडा येथील विद्यार्थ्यांनी गुरुवारी चक्क जिल्हा परिषदेच्या आवारातच शाळा भरविली.
पांढरमाती तांडा येथील जि.प. प्राथमिक शाळा बंद करुन जि.प. प्राथमिक शाळा खोकलेवाडी या शाळेत समायोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नावर पांढरीमाती येथील पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद कार्यालय गाठले. या ठिकाणी आपले म्हणणे मांडण्यासाठी शाळेच्या गणवेशात विद्यार्थी ठाण मांडून बसले होते. बंद केलेली शाळा सुरु करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
त्यात म्हटले आहे की, पांढरीमाती तांडा ही शाळा ३० सप्टेंबर २०१८ रोजी बंद करण्यात आली. खोकलेवाडी शाळेत या शाळेचे समायोजन करण्यात आले आहे. पांढरीमाती तांडा येथून खोकलेवाडी हे अंतर २ कि.मी.एवढे आहे. तांड्यावरील अनेक पालक ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. तेव्हा बंद केलेली शाळा पुन्हा सुरु करावी, अशी मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल पवार यांच्यासह इतर पालकांनी केली आहे.