परभणी जिल्ह्यात ७ पैकी तीन तूर खरेदी केंद्र सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:40 PM2018-02-09T18:40:05+5:302018-02-09T18:40:27+5:30
नाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळालेला आहे.
परभणी : नाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्यांना दिलासा मिळालेला आहे.
गतवर्षी जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र तुरीचे चांगले उत्पन्न निघाल्याने तूर उत्पादक शेतकर्यांना आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करताना अडचणीचा डोंगर पार करावा लागला होता. काही शेतकर्यांना तर दोन- दोन महिने केंद्रासमोर आपल्या वाहनांच्या रांगा लावाव्या लागल्या होत्या. शेतकरी व तूर खरेदी केंद्र प्रशासनात अनेक खटके उडाले होते. तूर उत्पादकांचा रोष पाहता राज्य शासनाला तीनवेळेस मुदतवाढही द्यावी लागली होती. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात गतवर्षी २ लाख ८० हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.
याही वर्षी शेतकर्यांना बर्यापैकी तुरीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे गतवर्षीसारखी परिस्थिती याहीवर्षी निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शेतकर्यांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक झाला आहे. खरीपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही बहरली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकर्यांना होती. परंतु, नैसर्गिक संकटाने शेतकर्यांचे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस ही पिके हातची गेली. त्यामुळे शेतकर्यांकडे केवळ तुरीचा शेतमाल शिल्लक आहे. परंतु, व्यापार्यांकडून शेतकर्यांचा शेतीमाल घेताना अडवणूक केली जात आहे.
सेलू, परभणी, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, बोरी या ठिकाणी नाफेडच्या वतीने तर मानवत येथे विदर्भ फेडरेशनच्या वतीने भावीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. गुरुवारपर्यंत परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. या केंद्रावर शुक्रवारपासून प्रत्यक्ष तूर खरेदीस सुरुवात होणार आहे. यावर्षी जवळपास साडेतीन हजाराच्या वर तूर उत्पादक शेतकर्यांनी आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे.
चार ठिकाणी टप्प्या-टप्प्याने होणार सुरुवात
नाफेडच्या वतीने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पूर्णा, गंगाखेड, बोरी या सहा ठिकाणी तर विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहे. त्यापैकी नाफेडकडून जिल्ह्यात तीन ठिकाणच्या केंद्रांचे उद्घाटन झाले आहे. नाफेडच्या पूर्णा, गंगाखेड, बोरी व विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे तूर खरेदी केंद्र येत्या आठ दिवसात सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.
खाजगी बाजारपेठेत कवडीमोल दर
राज्य शासनाने तूर उत्पाकांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापार्यांकडून केवळ ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. बाजार समितीच्या प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.