परभणीत आजपासून उरुसाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:52 PM2019-01-30T23:52:13+5:302019-01-30T23:52:40+5:30
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या ऊरुसाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरुसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येथील हजरत सय्यद शहा तुराबूल हक यांच्या ऊरुसाला गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. सध्या ऊरुसस्थळी जोरदार तयारी सुरु झाली असून उंच राहट पाळणे, मीना बाजार उभारणीचे काम सुरु आहे.
दीडशे वर्षांची परंपरा लाभलेला परभणीतील ऊरुस हर्षोल्हासात साजरा केला जातो. यावर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या दरम्यान ऊरुस यात्रा भरणार आहे. २ फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाने स्थानिक सुटी जाहीर केली असून प्रशासनाच्या वतीने मानाचा संदल काढून उरुसाला प्रत्यक्षात प्रारंभ होतो.
जिंतूर रोडवरील दर्गा मैदान परिसरात मीना बाजार आणि राहटपाळणे, मनोरंजनाचे साहित्य दाखल झाले आहेत. उरुसासाठी देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून व्यापारी परभणीत दाखल होतात. एकंदर उरुसाची शहरात जोरदार तयारी सुरु झाली आहे.
संदल काढून होतो उरुसाला प्रारंभ
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या परभणीतील उरुसास संदल काढून प्रारंभ केला जातो़ जिल्हाधिकारी कार्यालयाचा संदल मानाचा संदल असून, जिल्हाधिकारी डोक्यावर संदल घेऊन संदलला प्रारंभ करतात़ या संदलमध्ये जिल्हा प्रशासनातील अधिकारी सहभागी होतात़ त्यानंतर जिल्हा वक्फ बोर्ड, महानगरपालिका, जिल्हा परिषद, कृषी विद्यापीठ, एसटी महामंडळ या विभागांचेही संदल काढले जातात़ तसेच परंपरेनुसार मानाचे संदलही शहरातून निघतात़ २ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे़ उरुसाच्या तयारीसाठी महानगरपालिकेने उरुस परिसरामध्ये स्वच्छता, पाण्याची व्यवस्था केली असून, उरुस काळामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष बंदोबस्त लावला जातो़