राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धा: पुरुष गटात मुंबई उपनगरविरुद्ध पुणे, महिलांत ठाणेविरुद्ध पुणे जेतेपदासाठी लढणार
By ज्ञानेश्वर भाले | Published: November 20, 2023 07:28 PM2023-11-20T19:28:53+5:302023-11-20T19:29:55+5:30
दोन्ही गटांत पुण्याच्या संघाने गाठली अंतिम फेरी
परभणी : पुण्याच्या महिला, पुरुष या दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत ५९व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. यात पुरुष गटात मुंबई उपनगर तर महिला गटात ठाण्याचा संघ पुण्याशी विजेतेपदासाठी लढणार आहे.
शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर महिला गटातील चुरशीच्या उपांत्य सामन्यात धाराशिवला ठाण्याकडून ११-१२ असा एका गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. मध्यंतराची ५-४ ही एक गुणाची आघाडीच ठाण्याला विजय मिळवून देऊन गेली. रूपाली बडे (२.४०, १.२० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (२.२५ व १ मि. संरक्षण) यांची संरक्षणाची खेळी तर शीतल भोर (१.३० मि. संरक्षण व ३ गुण) हिची अष्टपैलू खेळी ठाण्याच्या विजयात उल्लेखनीय ठरली. धाराशिवच्या सुहानी धोत्रेने आक्रमणात चार गुण मिळवले. अश्विनी शिंदे हिची (३.३०, २ मिनिटे संरक्षण व २ गुण) अष्टपैलू खेळी संघाला विजय मिळवून देण्यात अपुरी पडली. दुसऱ्या उपांत्य लढतीत प्रियांका इंगळे (२ मिनिटे संरक्षण व ५ गुण), श्वेता वाघ (२.४० व १.२० मि. नाबाद संरक्षण व २ गुण) यांच्या अष्टपैलू खेळीमुळे गतविजेत्या पुण्याने रत्नागिरीवर १७-९ असा एक डावाने दणदणीत विजय मिळविला. रत्नागिरीच्या पायल पवार (१.३० मि. संरक्षण २ गुण) हिचे प्रयत्न अपुरे पडले.
पुरुष गटात पुणे व ठाणे ही लढत मध्यंतरापर्यंत अत्यंत चुरशीची झाली. मध्यंतरापर्यंत १०-९ अशी निसटती आघाडी असलेल्या पुण्याने १६-१४ असा २.५० मिनिटे राखून विजय साकारला. त्यांच्या विजयाचे शिल्पकार प्रतीक वाईकर (१.१० मि. संरक्षण ४ गुण), श्रेयश गरगटे (१ मि. संरक्षण व ३ गुण), ऋषभ वाघ (१ व २ मि. संरक्षण) हे ठरले. ठाण्याच्या आकाश कदम यांनी आपल्या धारदार आक्रमणात पाच गडी टिपले. गजानन शेंगळ, सुरज झोरे यांनी प्रत्येकी दीड मिनिटे संरक्षण केले. निखिल वाघ व संकेत कदम यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. दुसऱ्या उपांत्य सामन्यात गतविजेत्या मुंबई उपनगरने सांगलीवर २०-१२ अशी मात केली. हर्षद हातणकर (१.१०, १.१० मि. संरक्षण व ४ गुण), अक्षय भांगरे (१, १.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांची अष्टपैलू खेळी संघास विजय मिळवून दिला. सांगलीकडून अभिषेक केरीपाळे (दोन्ही डावात दीड मिनिटे संरक्षण), सुरज लांडे (३ गुण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.